सावधान ! मुंबईत डोळ्यांची साथ
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१६ – गेल्या काही दिवसांपासून मुंबईत डोळ्यांची साथ पसरली असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेने केले आहे. गेल्या दोन आठवड्यांत मुरली देवरा नेत्र रुग्णालयात डोळ्यांच्या साथीमुळे २५० ते ३०० रुग्णांवर उपचा करण्यात आले.
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढली की अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजार उद्भवतात. डोळे येणे, हा या संसर्गजन्य आजाराचा भाग आहे. डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळे लाल होणे, अशी लक्षणे सुरुवातीला एका डोळ्यात जाणवतात. त्यानंतर दुसऱ्या डोळ्यामध्येही हा संसर्ग जाणवतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काही वेळा डोळ्यातून चिकट द्रव पदार्थ बाहेरील बाजूस येतो. तसेच डोळ्यांना आतील बाजूस सूज येते. डोळ्यांना खाज सुटते, डोळे जड वाटतात, तीव्र प्रकाश सहन होत नाही. या प्रकारच्या संसर्गामुळे काही रुग्णांना तापही येतो. डोळे आले असतांना डोळ्यांना सतत हात लावू नये. तसेच स्वच्छ पाण्याने वारंवार डोळे धुवावेत.
डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा उपयोग करावा, डोळ्यांचा संसर्ग असेपर्यंत कुटुंबापासून वेगळे तसेच सुरक्षित अंतरावर राहावे. कोणत्याही प्रकारचे घरगुती उपाय न करता, वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.