पदाचा दुरुपयोग करणार्‍या महिला आयोगाच्या अध्यक्ष्यांना पदावरून हटवा

हिंदु जनजागृती समितीची मागणी

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.०७ :- आपल्या पदाचा राजकीय हेतूने उपयोग करून स्वपक्षातील प्रकरणांकडे दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर करणार्‍या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना या पदावरून तत्काळ हटवावे.‌ आणि निष्पक्ष व्यक्तीची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.‌ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.

नवी मुंबईत नुकतेच चर्चप्रणीत अनाथालयात अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले, यावर महिला आयोगाने कठोर भूमिका का घेतली नाही ? धनंजय मुंडे यांच्यावर महिलांनी आरोप केल्यावर त्या महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न का झाला नाही? राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या भाषणात ‘मम भार्या समर्पयामी…’ म्हणत समस्त महिलांचा जाहीर अपमान केला, त्यांना आयोगाने नोटीस का बजावली नाही? दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ‘दोबारा’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या संदर्भात ‘तिच्यापेक्षा माझी छाती मोठी आहे’ असे अतिशय अश्लाघ्य विधान केले होते, त्यांना देखील नोटीस पाठवण्याचे धाडस आमच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना झाले नाही; मात्र संभाजी भिडे गुरुजींनी एका महिला पत्रकाराला कुंकू लावण्याविषयी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून हेतूतः त्यांना लक्ष्य केले जात असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे.

मुळात यापूर्वी भिडे गुरुजींना भीमा-कोरेगांव प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न असफल झाल्यामुळे येनकेन प्रकारेन भिडे गुरुजींना त्रास देण्याचा हा प्रयत्न चालू आहे. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून त्यांच्या विचारांचा प्रसार केला, हिंदु संस्कृतीनुसार आचरण केले, महिलांचा सन्मान करण्याची शिकवण युवकांना दिली, अशा ऋषितुल्य व्यक्तीमत्त्वावर शिंतोंडे उडविणे निषेधार्ह असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.