शिल्लक सेनेचा रडगाणे मेळावा – शेखर जोशी

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. शिवसेनेच्या या दसरा मेळाव्याचे वर्णन ‘शिल्लक सेने’चा शेलकी टोमणे मेळावा असे करावे लागेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणात कोणताही नवीन मुद्दा किंवा नवीन विषय नव्हता. जुनेच तुणतुणे आणि रडगाणे गायले गेले. अर्थातच त्याला नेहमीप्रमाणे शेलक्या विशेषणांची अणि टोमण्यांची जोड होती.

शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच दसऱ्याच्या दिवशी दोन मेळावे झाले. खरी शिवसेना कोणाची? तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? हा मुद्दा प्रतिष्ठेचा झालेला असताना हा दसरा मेळावा पार पडला. वृत्तवाहिन्यांवर सुरुवातीला शिवाजी उद्यान मैदानावर दरवर्षीप्रमाणे गर्दी जमा झाली नसल्याचे सांगितले जात होते, तशी दृश्येही दाखवण्यात येत होती.

नंतर हे मैदान भरले. परंतु वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानाच्या तुलनेत शिवाजी पार्क उद्यान मैदानाची क्षमता मुळातच कमी असल्यामुळे जी गर्दी जमली त्यामुळे मैदान भरल्याचे दिसून आले.‌ गर्दी जमाविण्याचाच निकष लावला तर शिवाजी उद्यान मैदानाच्या तुलनेत वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानाची क्षमता जास्त असल्याने तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली असेच म्हणावे लागेल.

भाषण नव्हे वाचन – शेखर जोशी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला भाड्याने माणसे आणावी लागली, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभेला किंवा मेळाव्याला गर्दी जमा करण्यासाठी माणसे भाड्याने आणावीच लागतात हे कटू वास्तव आहे. आणि प्रत्येक जण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा चार बोटे आपल्याकडेच वळलेली असतात हे विसरून चालणार नाही.

आमचीच शिवसेना खरी, असे उद्धव ठाकरे कितीही तारस्वरात सांगत असले तरी पक्षाच्या एकूण रचनेतील आमदार, खासदार यांचा विचार केला तर उद्धव ठाकरे यांच्या गटात किंवा त्यांच्या शिवसेनेत आता हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आमदार आणि खासदार राहिले आहेत।

त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही आता खरोखरच ‘शिल्लक सेना’ झाली आहे. शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्या चाहत्यांना आणि दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बदसल्लागारांना ही बाब स्वीकारणे कितीही जड जात असले तरी ते कटू वास्तव आहे. कायद्याच्या दृष्टीनेही विचार केला तर दोन तृतीयांश इतकी सदस्य संख्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहे.

गोष्टीतील राजाचा आवडता पोपट मेलेला असला तरी तो मेला आहे, हे वास्तव राजाला कसे सांगायचे? राजा चिडला तर काय? यामुळे त्या राजाचे सरदार राजाला पोपट ध्यानस्थ बसला आहे, पोपटाणे मौनव्रत धारण केले आहे अशी थातूरमातूर कारणे राजाला सांगून वेळ मारुन नेतात त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.‌

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर फेसबुक लाईव्ह करून जी काही भाषणे केली, लोकांशी संवाद साधला त्यात किंवा शिवसेनेतर्फे आयोजित मेळाव्यातही उद्धव ठाकरे जे उगाळत होते,जे टोमणे मारत होते तेच त्यांनी दसरा मेळाव्यात केले. भाषणात कोणताही नवीन मुद्दा नव्हता. आमचे हिंदुत्व शेंडी जनव्याचेचे नाही असे उद्धव ठाकरे नेहमीच शेखी मिरवल्याप्रमाणे सांगत असतात. शिवाजी उद्यान मैदानातील दसरा मेळाव्यातही याचा त्यांनी पुन्हा उच्चार केला.

काही वर्षांपूर्वी शिवसेनेच्या तत्कालीन महापौर डॉ. शुभा राऊत यांनी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवात मूर्तीच्या उंचीवर मर्यादा घालण्यासाठी आणि प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घालून शाडू मातीच्याच मूर्ती करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र त्यावेळेस पक्षप्रमुख म्हणून तुम्ही त्यांना पाठिंबा दिला नाही किंवा चळवळ म्हणून हा मुद्दा लावून धरला नाहीत. महापालिकेत तुमच्याच पक्षाची म्हणजे शिवसेनेची सत्ता होती. मनात आणले असते तर तुम्हाला हे करणे सहज शक्य होते.

काही वेळेस लोकानुनय न करता अप्रिय वाटतील असे निर्णय घेण्याची धमक राजकीय नेतृत्वामध्ये असावी लागते. मात्र तुम्ही ती दाखवली नाहीत. तुमचे हिंदुत्व जर शेंडी जानव्याचे नव्हते तर त्यावेळेस डॉ. शुभा राऊळ यांच्या पाठीमागे खंबीरपणे का उभे राहिला नाहीत? त्यामुळे आमचे हिंदुत्व खरे किंवा आमचे हिंदुत्व शेंडी जानवण्याचे नाही या विधानाला काही अर्थ राहत नाही.

बॉलीवूडची विकृती, भारतीय संस्कृतीची नालस्ती – शेखर जोशी

पाकिस्तानात जिनांच्या कबरीवर नतमस्तक होणे आणि नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाला जाऊन केक खाणे भाजपच्या नेत्यांनी केले. पण पदाची काही कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या असतात. मनात किती नसले तरी दाखवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. ती राजकीय तडजोड असते. शिवसेनेनेही याआधीही अशा अनेक राजकीय तडजोडी केल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता.

पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदात याचाही ‘मातोश्री’वर पाहुणचार झाला होता. प्रश्न असा आहे की भाजपच्या नेत्यांनी जेव्हा जिनांच्या कबरीवर डोके टेकले किंवा नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला जाऊन केक खाल्ला तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत होतात. तुम्हाला या गोष्टी पटल्या नव्हत्या तर तेव्हा तुम्ही राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर का पडला नाहीत?

दसरा मेळाव्याच्या आधी गोरेगाव येथील नेस्को मैदानात झालेल्या शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात तुम्ही संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची रिकामी ठेवली होती. त्या मेळाव्यात किंवा दसरा मेळाव्यात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक खुर्ची रिकामी ठेवावी असे तुम्हाला का वाटले नाही? असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांना नक्कीच पडला.

दसरा मेळाव्यातही तुम्ही नेहमीप्रमाणेच तुम्हाला जे सोडून गेले त्यांना गद्दार असे संबोधून शरसंधान केले. हे आणखी किती दिवस सुरू ठेवणार? शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत आता निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. पक्षाच्या एकूण रचनेनुसार व तांत्रिकदृष्ट्याही दोन तृतीयांशपेक्षाही अधिक लोकप्रतिनिधी शिंदे गटात सहभागी झाले हे वास्तव आहे तर साहाजिकच तुमच्याकडून धनुष्यबाण चिन्ह काढून घेतले जाऊ शकते. (ते चिन्ह शिंदे गटाला मिळेल की नाही? की ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले जाईल की उद्धव ठाकरे यांच्या आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला वेगवेगळे निवडणूक चिन्ह दिले जाईल हा प्रश्न नंतरचा).

तुमच्या दुर्दैवाने आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सुदैवाने जर धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला मिळाले तर तुम्ही काय भूमिका घेणार? कायद्याच्या कसोटीवर त्याचे स्वागत करणार की नाही? याचाही उहापोह या भाषणात व्हायला हवा होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील अनेक आमदार तुम्हाला सोडून गेल्यामुळे आणि याचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी केल्याने तुमच्या मनात त्यांच्याबद्दल राग चीड असणे स्वाभाविक आहे. मात्र हा राग किंवा चिड तुम्ही एकनाथ शिंदे यांचे नातू आणि त्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा दीड वर्षांचा मुलगा रुद्रांश याच्यापर्यंत आणायला नको होती. तुमच्या वादात या लहानग्याला ओढण्याचे काही कारण नव्हते. ही गोष्ट चुकीचीच झाली.

मुंबई दूरदर्शनची पन्नाशी – शेखर जोशी

एकनाथ शिंदे यांना मी काय दिले नाही तरी त्यांनी माझ्याशी आणि शिवसेनेची गद्दारी केली, अंथरुणावर खिळलेलो असतानाही एकनाथ शिंदे यांनी त्याची पर्वा केली नाही, असे तुम्ही नेहमीच सांगत असता. एकनाथ शिंदे कसे आहेत हे तुम्हाला माहीत होते, ते धोका देऊ शकतात याचीही कल्पना होती तर तेव्हाच एकनाथ शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी का केली नाहीत?

तुम्ही आजारी होतात आणि घराबाहेरही पडू शकत नव्हतात तर त्यावेळी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार का सोडला नाहीत?
काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून तुमच्या अगदी विश्वासातील माणसाची नेमणूक का केली नाही? महाराष्ट्रात तशी प्रथा, परंपरा आहे, होती.
खरे म्हणजे दसरा मेळाव्यात तेच विषय न उगाळता, टोमणे न मारता जे घडून गेले ते पूर्णपणे विसरून जाणे आता गरजेचे आहे. यापुढे आम्ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेत गेलेल्या आमदार, खासदार यांना महत्त्व देणार नाही हे तुमच्या कृतीतून, शब्दातून शिवसैनिक, पदाधिकारी आणि सर्वसामान्य मतदारांना दाखवून देणे गरजेचे होते.

शिवसेना आणि तुमच्या बाबतीत यापुढे दुर्दैवाने आणखीन काही प्रतिकूल घडले तर त्याला आपण सामोरे कसे जाणार? या सर्व आव्हानांचा कसा मुकाबला करणार? याचा आराखडा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तुम्ही दसरा मेळाव्यात सादर करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे हा दसरा मेळावा एका अर्थाने शिल्लक सेनेचा शेलकी टोमणे मेळावाच ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published.