कल्याण : करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन

 

कल्याण : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी करू नका, ठरलेले कार्यक्रम रद्द करा किंवा पुढे ढकला, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आठवडाभरापूर्वीच दिल्या होत्या. असे असतानाही डोंबिवलीत १९ मार्च रोजी झालेल्या एका लग्नात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे यांनी आपल्या पतीसह हजेरी लावल्याचे समोर आले आहे.
लग्नाला आणि हळदी समारंभाला उपस्थित असलेल्या नवऱ्याच्या घरातील तरुणाला करोनाची लागण झाल्यानंतर त्याच लग्नात असलेली एक तरुणीही करोनाबाधीत झाली आहे. यामुळेच लग्नाला उपस्थित असलेल्या सर्वांनाच होम क्वारंटाइनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केडीएमसीच्या महापौर विनिता राणे यांनाही १४ दिवस विलगीकरणात राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
तुर्कीहून डोंबिवलीत आलेल्या आणि भावाच्या लग्नाला हजेरी लावलेल्या तरुणाला करोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने या भागाची पाहणी करून लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांना तपासणीसाठी धाडले होते. या तरुणाच्या घरातील तिघांचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरीही त्यांना विलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर धास्तावलेल्या लग्नातील वऱ्हाडींकडून त्यांचीही तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. आज या लग्नसमारंभाला उपस्थित असणाऱ्या एका तरुणीलाही करोनाची बाधा झाल्याचे निदान झाल्यानंतर लग्न आणि हळदीला उपस्थित असणाऱ्या सर्व वऱ्हाडींना विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शिवसेनेच्या महापौरांनीच आदेश डावलला
माजी नगरसेविकेच्या मुलाच्या या लग्नाला महापौरांसह आणखी काही नगरसेवकांनीही हजेरी लावली होती. त्यांची नावे आरोग्य विभागाकडे आलेली नसली तरी सामाजिक जबाबदारी ओळखून प्रत्येकाने स्वतःला होम क्वारन्टाइन करून घ्यावे, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान या सोहळ्यानंतर महापौरांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अधिकारी आणि आयुक्तांबरोबरही बैठक घेतली होती. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र ते आदेश डावलून शिवसेनेच्या महापौरांनीच या काळात लग्नाला हजेरी लावल्याने शहराचे प्रथम नागरिकच हे आवाहन जुमानत नसतील तर नागरिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email