‘संकल्प’चा कला त्रिवेणी विशेषांक
शेखर जोशी यांच्या फेसबुक वॉल वरुण
राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर-राणा प्रताप भवन, डोंबिवली (पश्चिम) माजी विद्यार्थी संघाच्या ‘संकल्प’ या मासिकाचा ‘कला त्रिवेणी’ विशेषांक नुकताच प्रकाशित झाला आहे. माजी विद्यार्थी संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दृक-दृश्य कलाकारांचा त्रिवेणी संगम असे या अंकाचे स्वरुप आहे. शाळेतील निवृत्त चित्रकला शिक्षिका कुमुद मराठे-डोके यांच्या पुढाकाराने माजी विद्यार्थी संघ सुरु करण्यात आला.माजी विद्यार्थी संघातर्फे विविध उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत असतात. या सर्व उपक्रमात शाळेचे व्यवस्थापन आणि शिक्षक, मुख्याध्यापक या सर्वांचे सहकार्य वेळोवेळी माजी विद्यार्थी संघाला मिळत असते. आर्किटेक्ट, कमर्शिअल, ज्वेलरी डिझाईन,फॅशन डिझाईन, शिल्पकला, सिरॅमिक पॉटरी अशा विविध कला शाखेत शाळेचे माजी विद्यार्थी आघाडीवर आहेत. त्यांचा या क्षेत्रातील अनुभव सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपुढे ठेवणे हा या कला त्रिवेणी विशेषांकाचा उद्देश असल्याचे डोके बाई यांनी सांगितले.
हेही वाचा :- डोंबिवली सोन्याचे दागिने चांदीचा वस्तू लांबवला
अंकात चित्रकला विभागात सिरॅमिक पॉटरी (मृणाल नाडकर्णी-गोखले), आनंद कला प्रवासाचा (वृषाली पटवर्धन-देशपांडे), उच्च कलाशिक्षण (केतकी डोल्हारे), शुभेच्छा पत्र (राजेश देशमुख), ऋणानुबंध (विराज साने) , कलाक्षेत्रात करिअर (जाह्नवी बेलवलकर), वास्तुस्थापत्य शास्त्र (समृद्धी कुलकर्णी), आर्किटेक्चर (मधुरा सप्रे) यांचे तर शास्त्रीय नृत्य विभागात कुचिपुडी शैली-मर्मबंधातील ठेव (मेधा साने-केळकर),वादन प्रवास-तबला नाद (गिरीश आठल्ये) तसेच क्रीडा विभागात नेमबाजी आणि योग (तेजल सावंत) यांचे लेख आहेत. शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आसावरी दामले, चित्रकला शिक्षिका डोके बाई यांचेही मनोगत अंकात आहे. राणा प्रताप- प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनंदा बेडसे, माध्यमिकचे मुख्याध्यापक भोजराज रायसिंग यांनी दिलेल्या शुभेच्छाही अंकात आहेत. अंकाची मुखपृष्ठ संकल्पना विराज साने यांची आहे. माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष म्हणून अंजली फाटक-जोगळेकर सध्या काम पाहात आहेत. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध कला शाखांमध्ये काम करणा-या विद्यार्थ्यांना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा माजी विद्यार्थी संघाचा हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय आणि अभिनंदनीय आहे.