जी – २०’ गटाच्या शिष्टमंडळाकडून ‘आपदा’मित्र आणि ‘आपदासखींचे कौतुक!
मुंबई दि. २६ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे ‘आपदा सखी’ आणि ‘आपदा मित्र’ स्वयंसेवकांचे ‘जी-२०’ गटाच्या शिष्टमंडळाकडून कौतुक करण्यात आले. ‘आपत्ती जोखीम सौम्यीकरण’ कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत २३ ते २५ मे यादरम्यान वांद्रे कुर्ला संकुल परिसरातील ‘जिओ कन्व्हेन्शन सेंटर’ येथे आयोजित करण्यात आली होती.
दादर, प्रभादेवी, वरळी, लालबाग, परळ परिसरात एक दिवस पाणीपुरवठा बंद
या बैठकीसाठी ‘जी २०’ सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्र संघाचे आणि भारत सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईत वास्तव्यास असताना या सर्व मान्यवर प्रतिनिधींच्या व्यवस्थेसाठी ५८ ‘आपदा मित्र’ व ‘आपदा सखी’ यांची स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली होती, असे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री. महेश नार्वेकर यांनी सांगितले.
तर सर्व स्वयंसेवकांना ‘समन्वय अधिकारी’ म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. देश विदेशातून आलेल्या प्रतिनिधींच्या आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत हे स्वयंसेवक प्रतिनिधींच्या सहकार्यासाठी उपस्थित होते. या अंतर्गत सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत हे स्वयंसेवक अविरतपणे कार्यरत होते, अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख रश्मी लोखंडे यांनी दिली. गुरुवारी सायंकाळी बैठकीच्या समारोपीय कार्यक्रमात बोलताना विविध देशातून आलेल्या सर्वच प्रतिनिधींनी ‘आपदा मित्र’ व ‘आपदा सखी’ यांच्या कामाचे विशेष कौतुक केले.