आनंद सोहळ्याची वारी

शेखर जोशी
गेली अनेक शतके सुरू असलेल्या ‘वारी’चे मुख्य वैशिष्ठ्य म्हणजे वारीसाठी कोणी कोणाला आमंत्रण देत नाही की, बोलावणे करत नाही, पण तरीही लाखो वारकरी वारीत सहभागी होतात.

दरवर्षी निघणारी वारी हा चमत्कार आहे. एकदा तरी ही वारी अनुभवावी, असे मनात होते. वारी मंडळाच्या (रोहा-रायगड) माध्यमातून रविवारी (२६ जून) हा योग जुळून आला.

यंदाच्या वर्षी वारी मंडळाने जगतगुरू तुकोबारायांच्या पालखीचे दर्शन घेऊन वारीतील यवत ते वरवंड असा टप्पा पार करायचे ठरविले होते. यवतपासून पुढे काही अंतरावर असलेल्या भांडीगाव येथे दुपारी बारा- सव्वाबाराला पोहोचलो.

तिथे देहू येथून निघालेला तुकोबारायांच्या पादुकांचा रथ मार्गक्रमण करत पोहोचलेला होता. स्थानिक गावक-यांची दर्शनासाठी खूप मोठी गर्दी झाली होती. रथातील तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आणि पादुकांना हात लावून माथा टेकण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली होती.

या गर्दीत तान्ह्या बाळाला घेऊन येणारी माऊली तशीच वयोवृद्ध आणि चेह-यावर सुरकुत्या पडलेली माऊलीही होती. तुकोबारायांच्या पादुकांना स्पर्श करून पादुकांवर डोके टेकल्यावर दर्शन घेणा-या आबालवृद्धांच्या चेहऱ्यावरील आनंद, समाधान अवर्णनीय होते. आम्हीही या गर्दीतील एक झालो आणि पादुकांचे दर्शन घेतले.

पादुकांवरील बुक्का कपाळी लावला आणि धन्य झालो. रथ ओढणारे बैल विश्रांती घेत असल्याने जोखड रिकामे होते. त्यामुळे क्षणभर का होईना तिथे उभे राहून, त्या जोखडाला हात लावून तो क्षण माझ्यासह अनेकांनी भ्रमणध्वनीत बद्ध केला.

आमचे पादुकांचे दर्शन घेऊन झाले आणि सर्वांनी भांडीगाव येथून वारीत चालायला सुरुवात केली. भगवा ध्वज हाती घेऊन भजन, अभंग म्हणत आणि झाजांच्या नादात, ज्ञानोबा-तुकोबांच्या नाम गजरात आम्ही सर्वांनी वरवंडच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली.

भजन, अभंग म्हणत काही किलोमीटर चालल्यानंतर एका मोकळ्या शेतात आम्ही सर्वजण पोटपूजा करण्यासाठी थांबलो. सकाळी बसमध्ये मेथीच्या पराठ्यांचे पाकिट प्रत्येकाला देण्यात आले होते. खाणे झाल्यावर आम्ही सर्वांनी मुख्य रस्त्याकडे यायला सुरुवात केली. थोडा वेळ आधी भांडीगाव येथे थांबलेला तुकोबारायांच्या पादुकांचा रथ वरवंडच्या दिशेने मार्गस्थ झाला. आणि काही क्षणात हजारो वारक-यांनी रथामागून चालायला सुरुवात केली.

आतापर्यंत हे हजारो वारकरी नेमके कुठे होते? असा प्रश्न मनात आला. या रस्त्यावर मागे आणि पुढे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त वारक-यांचा महासागर उसळलेला होता. आम्ही सर्वजणही एका बाजूने नामघोष करत वरवंडच्या दिशेने चालत होतो.

वाटेत एका ठिकाणी विठुमाऊलीच्या जयघोषात फेरही धरला. वाटेत काही वेळ जोरदार पाऊस आला आणि आम्ही सर्वजण विठुनामाच्या जयघोषासह जलधारातही न्हाऊन निघालो

तुकोबारायांच्या या रथामागे अनेक दिंड्या सहभागी झाल्या होत्या. यात वेगवेगळ्या वयोगटातील वारकरी होते. डोक्यावर तुळशीवृंदावन, कळशा घेतलेल्या महिला होत्या तसे टाळ, मृदुंग, झांजा घेतलेले वृद्ध आणि तरुणही होते. ज्ञानेश्वर माऊली, तुकोबारायांच्या नामाचा जयघोष चालला होता. वारीतील सर्व वारकरी शिस्तीत चालत होते. चालताना वीणाधारी वारकरीही पाहायला मिळाले.

भांडीगावपासून पुढे सुमारे आठ किलोमीटर अंतरावर चौफुला येथे तेधील स्थानिकांना पादुकांचे दर्शन घेता यावे म्हणून रथ थांबणार होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक स्थानिक गावकरीही रथाची वाट पाहात उभे राहिलेले पाहायला मिळाले.

काही ठिकाणी तर पादुकांचे दर्शन घेता आले नाही म्हणून ज्या मार्गाने रथ गेला त्या रस्त्यावरील माती भक्तीभावाने कपाळाला लावणा-या काही महिलाही दिसल्या. वाटेत काही संस्था, संघटनांकडून वारक-यांना चहा, नाश्ता, पाणी मोफत देण्यात येत होते. तर काही ठिकाणी सशुल्क व्यवस्था केलेली होती.

स्थानिक प्रशासनाकडूनही मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. काही स्वयंसेवी, सामाजिक संस्थाकडूनही आरोग्य तपासणी सुविधांचे कक्ष उभारण्यात आले होते.

दरवर्षी होणारी ही पंढरीची वारी म्हणजे भक्तिप्रेमाचा आविष्कार नसून भक्तिप्रेमाची अनुभती आहे. विठ्ठलाच्या निरपेक्ष प्रेमाच्या ओढीने वारकरी अनेक गावांहून चालत वारीत सहभागी होतात आणि मजल दरमजल करत पंढरपुरात येतात.

पंढरपुरात जमलेल्या लाखो वारक-यांना विठ्ठलाचे थेट दर्शन होतही नाही. ही मंडळी कळसाला नमस्कार करून माघारी फिरतात.

‘विठ्ठल माझी माय विठ्ठल माझा बाप’ असे म्हणत वारकर्‍यांची मांदियाळी पंढरपूरच्या दिशेने अखंडपणे वाटचाल करीत असते. नाचत, गात, टाळ-मृदंगाचा ध्वनी आसमंतात निनादत, रिंगण, फुगडी, भारुडे आदी विविध आविष्कार करीत भक्तीचा हा प्रवाह वाहत राहतो.

दिंडीच्या वाटेवर राहण्याची व्यवस्था, झोपण्याची सोय चांगली असतेच असे नाही. पण तरीही दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठल नामाच्या घोषात चालत असतो. कोणत्याही लौकिक सुविधांची पर्वा करायला त्याच्याकडे वेळच नसतो.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी व जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून निघते. पैठणहून संत एकनाथ महाराज, त्र्यंबकेश्वरवरून संत निवृत्तिनाथांची, मुक्ताईनगरवरून (जि.जळगाव) संत मुक्ताबाईं, शेगावहून संत गजानन महाराज आदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पालख्या निघतात आणि आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात पोहोचतात. या वारीत अध्यात्म, व्यवस्थापन, लोककला, संगीत आणि मानवी भाव भावनांचा संगम पाहायला मिळतो.

चौफूला सोडल्यावर पुढे चार/पाच किलोमीटर अंतरावर वरवंड येथे तुकोबारायांच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम होता. रोह्याहून यवत- भांडीगाव येथे आम्ही ज्या बसने आलो होतो ती बस पालखीचा मुक्काम जेथे होता त्या ठिकापासून काही अंतरावर एका मैदानात उभी केली होती.

आमची सर्व मंडळी एक एक करत तिथे आली. संध्याकाळचे पाच/साडेपाच वाजले होते. सहा वाजता आम्ही वरवंड येथून निघालो. वाटेत वारजे येथे जेवणासाठी थांबलो. पावणे अकरावाजता तिथून निघालो आणि रात्री सव्वादोन/अडीचच्या सुमारास रोह्यात उतरलो.

 

 

एकदा तरी वारी अनुभवावी असे म्हणतात. यंदा वारीचा हा योग जुळून आला. जगद् गुरु तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन झाले हा भाग्ययोगच म्हणायचा. वारीत चालताना झालेला विठुनामाचा गजर, भजने, भक्तीगीते यांनी वेगळेच भक्तीमय वातावरण निर्माण झाले.

सोबत असणारे हजारो वारकरी आणि त्यांच्या टाळ, मृदुंगाचा गजर हा भारून टाकणारा अनुभव होता. महेश पेंडसे, श्रीधर राऊत, आनंद जोशी यांच्या नियोजनात यंदाची वारी उत्तम झाली.
जय जय रामकृष्ण हरी

One thought on “आनंद सोहळ्याची वारी

  • June 28, 2022 at 8:28 pm
    Permalink

    जय जय रामकृष्ण हरी

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published.