निवडणूक चिन्हांचा रंजक प्रवास – शेखर जोशी

[शेखर जोशी]

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात गोठविल्यानंतर गदारोळ सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह पुन्हा मिळेल की गमवावे लागेल? हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल की त्यांनाही नवे निवडणूक चिन्ह घ्यावे लागेल? हे प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहेत. मात्र निवडणूक चिन्ह गोठविले जाण्याचा प्रकार या आधीही देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाबाबत घडला होता. राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा हा एकूणच प्रवास रंजक आहे.

बैल जोडी ते हाताचा पंजा

काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह आत्तापर्यंत तीन वेळा बदलण्यात आले. या निवडणूक चिन्ह बदलाचा इतिहासही रंजक आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५१-५२ मध्ये देशात पहिली लोकसभा निवडणूक झाली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने ही निवडणूक लढवली. तेव्हा काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘बैल जोडी’ होते. त्यानंतर बरीच वर्षे काँग्रेसने ‘बैलजोडी’ या निवडणूक चिन्हावरच निवडणूक लढविली.

काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू झाले आणि १९६९ मध्ये काँग्रेस पक्ष फुटला. मूळ काँग्रेसचे नेतृत्व मोरारजी देसाई आणि कामराज हे नेते करत होते तर फुटलेल्या काँग्रेसचे नेतृत्व इंदिरा गांधी करत होत्या. इंदिरा गांधी यांनी आपल्या काँग्रेसचे नाव काँग्रेस (आर) असे केले. मोरारजी देसाई,कामराज यांची काँग्रेस (ओ) अशी ओळखली जाऊ लागली. शओरिजिनल काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांची ‘आर’ काँग्रेस या दोघांकडूनही ‘बैल जोडी’ या निवडणूक चिन्हावर दावा करण्यात आला. निवडणूक आयोगाकडे हे भांडण गेल्यानंतर निवडणूक आयोगाकडून मोरारजी देसाई आणि कामराज यांच्या काँग्रेसला ‘बैल जोडी’ हे चिन्ह देण्यात आले तर इंदिरा गांधी यांनी त्यावेळी ‘गाय वासरू’ या निवडणूक चिन्हाची निवड केली. १९७१ मध्ये झालेली लोकसभेची निवडणूक इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसने ‘गाय वासरू’ या निवडणूक चिन्हावरच लढविली. पुढे १९७७ पर्यंत इंदिरा गांधी यांनी ‘गाय वासरू’याच निवडणूक चिन्हावरच निवडणुका लढविल्या.

आणीबाणी नंतर १९७७ मध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा फुटला. ब्रम्हानंद रेड्डी आणि देवराज अर्स यांनी वेगळी कॉंग्रेस काढली. १९७८ मध्ये इंदिरा गांधी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष फोडला आणि काँग्रेस (आय) पक्षाची स्थापना केली. आपलीच काँग्रेस खरी आहे असा दावा इंदिरा गांधी यांनी केला.‌ त्यावेळी निवडणूक आयोगाकडून काँग्रेसचे ‘गाय वासरू’ हे चिन्ह गोठवले गेले. निवडणूक आयोगाकडून इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसला हत्ती, सायकल आणि हाताचा पंजा अशा तीन चिन्हांमधून एका निवडणूक चिन्हाची निवड करण्याचे सुचविले. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी ‘हाताचा पंजा’ निवडणूक चिन्हाची निवड केली. १९८० मध्ये झालेली लोकसभेची निवडणूक इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसने ‘हाताचा पंजा’ या निवडणूक चिन्हावर लढविली. या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसला भरघोस यश मिळाले. आणि काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला.

मागणी चरख्याची, निवडले घड्याळ

काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. समाजवादी काँग्रेस पक्षाचे
‘चरखा’ हे निवडणूक चिन्ह आपल्या मिळावे म्हणून पवार यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला. समाजवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाल्यामुळे त्यांचे ‘चरखा’ हे चिन्ह आपल्याला मिळावे असे शरद पवार यांचे म्हणणे होते. तर समाजवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाल्यामुळे त्या पक्षाची ओळख पुसली गेली. पक्ष आणि निवडणूक चिन्ह विलीन झाल्याने ‘चरखा’ निवडणूक चिन्हावर दावा करता येणार नाही. ते चिन्ह गोठविण्यात आले असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.‌ अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याळ या निवडणूक चिन्हाची निवड केली

पणती ते कमळ

भारतीय जनता पक्ष म्हणजे पूर्वीचा जनसंघ. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा पराभव झाला आणि जनता पक्ष सत्तेवर आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा असलेला जनसंघ सत्तेत सहभागी झाला.‌ ‘पणती’ हे जनसंघाचे निवडणूक चिन्ह होते. या.स्व. संघ ही जनसंघाची पितृसंघटना असल्याने जनसंघाची राजकीय निष्ठा सहाजिकच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी होती. पुढे अंतर्गत कलहातून जनता पक्षाचे सरकार कोसळले. जनता पक्षातून ‘जनसंघ’ वेगळा झाला आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. तेव्हा भारतीय जनता पक्षाने कमळ या निवडणूक चिन्हाची निवड केली.

ढाल तलवार ते धनुष्यबाण

शिवसेनेने बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ‘ढाल तलवार’या निवडणूक चिन्हावर लढवली. १९८० च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ‘रेल्वे इंजिन’ चिन्ह मिळाले.

शिल्लक सेनेचा रडगाणे मेळावा – शेखर जोशी

तर १९८५च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मशाल, सूर्य, बॅट-बॉल अशी वेगवेगळी चिन्हे मिळाली. १९८४ साली शिवसेनेने भाजपच्या ‘कमळ’ निवडणूक चिन्हावर लोकसभा निवडणूक लढविली.

भाषण नव्हे वाचन – शेखर जोशी

१९८९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पहिल्यांदा ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह मिळाले. गेली ३३ वर्षे धनुष्यबाण हा शिवसेनेची ओळख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.