अमिताभ बच्चन यांच्या ‘मराठी रंगछटा’! – शेखर जोशी

बॉलिवूडचे ‘बीग बी’ अर्थातच अमिताभ बच्चन. हिंदी चित्रपट सृष्टीचे सुपरस्टार‌. आज वयाच्या ८० व्या वर्षातही ते चित्रपट, जाहिरात यासह समाज माध्यमांवर सक्रिय आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीने त्यांना सम्राटपद बहाल केले असले तरीही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची आणि मराठीचे त्यांचे विशेष नाते आहे. या नात्यांविषयीच्या काही खास गोष्टी.

‘आपली थापडी’ चित्रपटाविषयीचे ट्विट मराठीत

‘आपडी थापडी’ अमिताभ बच्चन यांचे मराठी ट्विट

महानायक अमिताभ बच्चन हे समाज माध्यमांवर सक्रीय आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आपडी थापडी’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर बच्चन यांनी ट्वीटरवर शेअर केला. त्यांनी मराठीत टृविट करून चित्रपटाला शुभेच्छाही दिल्या होत्या. श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे, संदीप पाठक, नंदू माधव हे कलाकार चित्रपटात आहेत.‌

‘अक्का’ मराठी चित्रपटात पाहुणे कलाकार


अक्का’ या मराठी चित्रपटात अमिताभ यांनी पाहुणे कलाकार म्हणून भूमिका केली होती. बच्चन यांचे रंगभुषाकार दिपक सावंत असून गेली अनेकवर्षे ते अमिताभ यांच्याबरोबर काम करत आहेत. सावंत यांनी १९९४ मध्ये ‘अक्का’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात बच्चन यांनी काम करावे अशी त्यांची इच्छा होती. चित्रपटातील एका गाण्यात अमिताभ व त्यांची पत्नी जया बच्चन यांचा सहभाग होता. अमिताभ बच्चन या चित्रपटात पहिल्यांदा मराठीत बोलले. चित्रपटात अजय फणसेकर, सुलभा देशपांडे, प्रशांत दामले यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीधर जोशी यांनी केले होते.

‘एबी आणि सीडी’

एबी आणि सीडी चित्रपटात विक्रम गोखले आणि अमिताभ

दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ए बी आणि सीडी’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. चित्रपटात विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव आदी कलाकार होते. मिलिंद लेले दिग्दर्शित चित्रपटात बच्चन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

अमिताभ यांचे मराठी भाषण
व्ही शांताराम फाउंडेशन आणि साप्ताहिक विवेक यांच्या संयुक्त विद्यमाने विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात ‘शतकमहोत्सवी मराठी चित्रसंपदा ३ मे १९१३ ते ३ मे २०१३’ या सूचीचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व्ही. शांताराम फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम आणि अमिताभ बच्चन उपस्थित होते. या सोहळ्यात अमिताभ यांनी पंधरा मिनिटे मराठीत भाषण करून उपस्थितांची दाद मिळविली होती.

मी जो काही आहे तो महाराष्ट्रामुळे
पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप अमिताभ बच्चन यांच्या काव्यगायनाने झाला होता. यावेळी बच्चन यांनी, महाराष्ट्राच्या भूमीला माझा नमस्कार. आयुष्याच्या ६८ वर्षांपैकी ४१ वर्षे मुंबई-महाराष्ट्रात घालविली, मी जो काही आहे तो महाराष्ट्रामुळे, याचा मला अभिमान आहे, असे सांगितले होते. कवीवर्य सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या कवितेचा खास उल्लेख केला होता. तसेच राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांच्या ‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा… ‘ या ओळी सादर करून काव्यवाचनाला सुरुवात केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.