केंद्रीय मोटार वाहन नियमातल्या प्रस्तावित सुधारणा
नवी दिल्ली, दि.१७ – केंद्रीय मोटार वाहन नियमातल्या सुधारणांचा मसुदा, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केला आहे. यामध्ये राष्ट्रीय परवानाधारक सर्व व्यावसायिक वाहनांना फास्टॅग आणि वाहन ट्रॅकिंग यंत्रणा उपकरण अनिवार्य करण्याचा समावेश आहे. वाहनाच्या पुढच्या काचेवर फास्टॅग लावावा लागेल. त्याचबरोबर राष्ट्रीय परवानाधारकांना वाहनाच्या पुढे ठळक अक्षरात नॅशनल परमीट किंवा एन/पी असे दर्शवावे लागणार आहे.
वाहन चालवण्याचा परवाना आणि पीयुसी सर्टिफिकेट डिजिटल स्वरुपातही ठेवण्याची परवानगी या प्रस्तावित सुधारणेत आहे. या संदर्भातील अधिक तपशिल मंत्रालयाच्या www.morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या प्रस्तावित सुधारणांबाबत मंत्रालयाने सूचना आणि हरकती मागवल्या असून सहसचिव (वाहतूक) रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, वाहतूक भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली 110001 या पत्त्यावर मागवल्या आहेत. अथवा js-tpt@gov.in या पत्त्यावर 11 ऑगस्टपर्यंत मेल कराव्यात असे मंत्रालयाने म्हटले आहे.