शेतकऱ्यांना दर्जेदार बि- बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे- मुख्यमंत्री शिंदे
राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न
मुंबई, दि. २४
आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतानाच शेतकऱ्यांना दर्जेदार बि- बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज सकाळी राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणीपरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक आदी उपस्थित होते.
आगामी खरीप हंगामाची उत्तम पूर्व तयारी झाली आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. कृषी विभागाने गुणवत्ता नियंत्रण पथके, भरारी पथके कार्यान्वित करावीत. यंदाच्या मॉन्सूनवर एल- निनोचा प्रभाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पुरेसा पाऊस आणि जमिनीत ओल पाहूनच शेतकऱ्यांनी पेरण्यांचा निर्णय घ्यावा, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
यंदाच्या पावसाळ्यावर एल- निनोचा प्रभाव असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अन्य दोन घटक पावसाला अनुकूल आहेत. त्यानंतरही पावसाने ओढ दिली, तर कृषी विद्यापीठांनी पेरण्यांचे वेळापत्रक निश्चित करावे. बोगस बियाणे, खते विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई करावी. वेळप्रसंगी त्यांचे परवाने रद्द करावेत.
शेतकऱ्यांची कृषी कर्जासाठी अडवणूक करणाऱ्यांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल दाखल करावा, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कृषी मंत्री सत्तार, कृषी विभागाचे प्रधान सचिव डवले, सहकार विभागाचे मुख्य सचिव अनुपकुमार याडवण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी, राहुरी येथील महात्मा जोतिराव फुले कृषी विद्यापीठचे कुलगुरु डॉ. प्रदीपकुमार पाटील, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, भारतीय हवामान विभागाचे पुणे येथील प्रमुख होसाळीकर यांनी आपापल्या विभागाचे सादरीकरण केले.
—–