उत्तराखंड आणि महाराष्ट्रातील उद्योग संघटनांमध्ये करार

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.१५ :- उत्तराखंड आणि महाराष्ट्र राज्यातील व्यापार संघटनांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे सोमवारी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर तसेच उत्तराखंड येथील  सिडकुल मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन यांच्यामध्ये सामंजस्य करार संपन्न झाला.

उत्तराखंड येथे माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, नैसर्गिक उत्पादने या क्षेत्रात फार मोठा वाव आहे. धार्मिक पर्यटनाशिवाय उत्तराखंड येथे साहसी पर्यटनासाठी देखील महाराष्ट्रातून अनेक लोक जातात. महाराष्ट्रातील उद्योजकांनी अधिक यशस्वी व्हावे व उत्तराखंडला देखील औद्योगिक दृष्ट्या पुढे येण्यास सहकार्य करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी केले.

सामंजस्य करार झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना उत्तराखंड राज्याने उद्योग व्यापारासाठी एक खिडकी योजना लागू केली असून उद्योग वाढीसाठी लँड बँक तयार करण्यात येत आहे, असे उत्तराखंडचे मंत्री चंदन राम दास यांनी सांगितले. तर महाराष्ट्र चेंबर लवकरच उत्तराखंड येथे कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरु करेल तसेच चेंबर तर्फे आयोजित मुंबई येथील व्यापार प्रदर्शनाला उत्तराखंड येथील उद्योगांना निमंत्रित करेल असे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले.  सिडकुल मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ हरिन्द्र कुमार गर्ग, महाराष्ट्र चेंबर ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, चेंबरच्या महिला समितीच्या अध्यक्ष संगिता पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.