हिंदु जनजागृती समितीच्या पाठपुराव्यानंतर पारोळा किल्ल्याच्या संवर्धनासाठी जिल्हाधिकार्‍यांनी घेतली बैठक !

 

*पारोळा किल्ल्याचे संवर्धन करण्यासह त्याचे पावित्र्य भंग करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे प्रशासनाला निर्देश !*

जळगाव जिल्ह्यातील पेशवेकालीन आणि ऐतिहासिक पारोळा किल्ल्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. किल्ल्याची दयनीय अवस्था दूर करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती मागील 2 वर्षांपासून सातत्याने स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्याकडे पाठपुरावा करत होती. समितीच्या या चळवळीला यश आले असून जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 7 जून 2022 या दिवशी पारोळा किल्ल्याच्या संवर्धनासाठी एक बैठक बोलावली .

या बैठकीत किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी प्रशासनाला कृती आरखडा तयार करण्याचे, तसेच किल्ल्यात अस्वच्छता अन् गैरकृत्य करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

या बैठकीला हिंदु जनजागृती समितीचे जळगावचे समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर, समितीच्या कु. रागेश्री देशपांडे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, तहसीलदार अनिल गवांदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयश्री भगत, किल्ला संवर्धक डॉ. अभय रावते आदी उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीने मागणी केल्याप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी राऊत यांनी पुढील महत्त्वपूर्ण सूचना प्रशासनाला केल्या आहेत. यात किल्ल्याची डागडुजी करून भिंतीवर उगवलेली झाडे काढणे, किल्ल्याची आतून, तसेच परिसराची स्वच्छता करणे, सांडपाणी जाण्यासाठी गटाराची व्यवस्था करणे, किल्ल्यावर मद्यपान, जुगार आदी अवैध धंदे करणार्‍यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करणे, लघवी-शौच करून किल्ल्याच्या परिसर अस्वच्छ करण्याला प्रतिबंध करण्यास सांगितले आहे.

समितीच्या मागण्यांची तत्परतेने दखल घेऊन पुढील कार्यवाही केल्यामुळे हिंदु जनजागृती समितीने जिल्हाधिकार्‍यांचे अभिनंदन केले आहे.

पारोळा किल्ल्याची दुरावस्था लक्षात आल्यावर समितीने राज्य पुरातत्व विभागाकडून माहितीच्या अधिकाराखाली किल्ल्याच्या डागडुजी आणि संवर्धन यांसाठी केलेल्या कामांचा तपशील मागितला होता. जून 2021 मध्ये मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून किल्ल्याच्या संवर्धनाची मागणीही केली होती.

शिवसेनेचे स्थानिक आमदार श्री. चिमणराव पाटील यांसह काही दिवसांपूर्वी समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांचीही भेट घेतली होती. त्याला जिल्हाधिकार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता प्रशासनाने जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे तत्परतेने कार्यवाही करून पारोळा किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनाचे कामही वेळेत करावे, असेही समिती म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.