अमित ठाकरेंच्या लग्नाला जाणार का त्यावर आदित्य ठाकरें म्हणाले…
मुंबई दि.१० – अमित ठाकरे यांच्या लग्नाला जाणार का, असा प्रश्न युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर लग्नाला जाणार, जावंच लागणार. त्यात राजकारण नाही, असं उत्तर आदित्य यांनी दिलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव २७ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाचं निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देण्यासाठी शनिवारी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. आदित्य आणि अमित ठाकरे हे एकमेकांचे चुलत भाऊ लागतात. राजकारणामुळे राज आणि उद्धव यांच्यातील फारसे चांगले नाहीत. मात्र तरीही या दोघांनी कौटुंबिक संबंध जपल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्यामुळेच अमित ठाकरेंच्या लग्नाला जाणार का, असा प्रश्न विचारताच क्षणाचाही विलंब न लावता आदित्य यांनी होकारार्थी उत्तर दिलं.
हेही वाचा :- कल्याण-डोंबिवलीत नायलॉन मांजावर बंदी आणण्याची पक्षीमित्रांची मागणी…
अमित ठाकरे २७ जानेवारीला फॅशन डिझायनर असलेल्या मिताली बोरुडेसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. याच लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज शनिवारी मातोश्रीवर गेले होते. यानंतर राज आणि उद्धव यांचे मातोश्रीबाहेरचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते. राज ठाकरे आणि मातोश्री यांच्यातलं नातं अनेकदा दिसून आलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हृयात असतानाच राज यांनी शिवसेनेला रामराम करत नवा पक्ष स्थापन केला. मात्र बाळासाहेब कायमच राज यांच्यासाठी वंदनीय राहिले. माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे, हे राज यांचे शिवसेनेला सोडचिठ्ठी देतानाचे शब्द होते. यानंतर बाळासाहेब यांची प्रकृती खालावली होती, त्यावेळी राज मातोश्रीवर गेले होते. २०१२ मध्ये उद्धव यांच्यावर अँजियोप्लास्टी झाली, त्यावेळी राज स्वत: कार चालवत त्यांना मातोश्रीपर्यंत घेऊन गेले होते.