कल्याणच्या आधारवाडी कारागृहात आरोपी महिलेची आत्महत्या

ABI News

कल्याण- येथील आधारवाडी कारागृहामध्ये मुलाच्या हत्येप्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या महिलेने, कारागृहाच्या शौचालयात आज दुपारच्या सुमारास साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मायाबाई रामदास आगळे (५२) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.

मायबाई ही ठाणे येथील चिराग नगर येथे कुटूंबासह राहत होती. तीला शिवाजी रामदास आगळे (वय २५) व सतीश रामदास आगळे (वय २४) अशी दोन मुले होती. त्यापैकी शिवाजी हा एका डेअरीमध्ये काम करत होता. तर सतीश हा बेरोजगार होता.

मायाबाई दुसऱ्यांच्या घरातील छोटी-मोठी कामे करून कुटुंबाचा उदर्निवाह करत होती,मात्र तिचा लहान मुलगा सतीश हा दारू पिऊन घरात सतत त्रास द्यायचा, पैशांची मागणी करायचा. त्यामुळे सतीशच्या सततच्या त्रासाला कंटाळून मायाबाईने अखेर आपला मोठा मुलगा आणि दुरच्या एका नातेवाईकाच्या मदतीने सतीशची ७ जानेवारीला हत्या केली व पुरावा नष्ट करण्यासाठी तिने सतीशचा मृतदेह कसारा घाटात फेकला, मात्र पोलिसांनी अवघ्या ४ तासांमध्ये या हत्येचा शोध लावला.

सतीशचा घातपात झाल्याचा बनाव आरोपी आई मायाबाई व शिवाजी आगळे यांनी रचला. आरोपी ९ जानेवारी रोजी सकाळी मृत सतीशचे कपडे घेऊन पुन्हा कसारा घाटात आले. तिथे टेहळणी करून ते कपडे घाटातील एका कठड्यावर ठेवले. तेथून काही अंतरावर असलेल्या महामार्ग पोलीस चौकीत गेले व तेथे कार्यरत असलेले महामार्ग पोलीस अधिकारी अमोल वालझाडे यांना भेटून मला फोन आला, आमच्या मुलाचा घातपात झालाय, त्याचे कपडे घाटात आहेत असे सांगितले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महामार्ग पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ कसारा पोलीस ठाण्यात कळवले व तपास सुरू झाला. कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डी पी भोये यांनी वरिष्ठांना माहिती देत पोलीस उपनिरीक्षक भोस व कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनीही घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला असता, पोलीस अधिकाऱ्यांना घाटातील दरीत १५० फुटांवर एक संशयास्पद पोते दिसले. पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने दरीतील पोते वर काढले असता त्यात सतीशचा मृतदेह आढळून आला होता.

याप्रकरणी बनाव रचणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email