नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपीची हत्या; बहिणीच्या आत्महत्येचा घेतला बदला

नालासोपारा दि.१५ :- आपल्या बहिणीच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या सख्या भावोजीची पोलीस ठाण्यात जाऊन चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नालासोपारा पोलीस ठाण्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज दुपारी साडेचारच्या सुमारास नालासोपारा पोलीस ठाण्यातील डिटेक्शन रुममध्ये पोलिसांच्या देखत घडली आहे. याप्रकरणी रवींद्र शंकर काळेल याला हत्येप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा :- बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचा ‘वाघ’ ‘मेंढा’ झाला आहे.” – नारायण राणे

नेमके काय घडले?

नालासोपारा पश्चिमेकडील धनंजय नाका येथील मातृछाया इमारतीत राहणार्‍या कोमल आकाश कोळेकर याविवाहितेने घरगुती भांडणातून १३ ऑक्टोबरला घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी तिचा पती आकाश कोळेकरला नालासोपारा पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास रविंद्र नालासोपारा पोलीस ठाण्यात आला होता. यावेळी पोलीस डिटेक्शन रुममध्ये कोमलच्या आत्महत्येप्रकरणी आकाशची चौकशी करीत होते.

हेही वाचा :- कल्याण डोंबिवलीच साडेसहा हजार कोटींचं पॅकेजचं काय झालं? – राज ठाकरे

रविंद्र थेट डिटेक्शन रुममध्ये शिरला आणि पोलिसांना काही कळायच्या आतच त्याने चाकूने आकाशचा गळा चिरला आणि त्याच्यावर सपासप वार केले. यात आकाश जागीच ठार झाला. याप्रकरणी पोलिसांनी रविंद्रला ताब्यात घेतले आहे. कोमलने आकाशशी प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून रविंद्र नाराज होता. त्यात कोमलने आत्महत्या केल्याने तो अधिकच संतापला होता. संतापाच्या भरात रविंद्रने पोलीस ठाण्यात शिरून आकाशची गळा चिरून हत्या करून बहिणीच्या आत्महत्येचा बदला घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.