धार्मिक द्वेषातून हिंदू देवतांची विटंबना करणाऱ्या ख्रिश्चन नर्सवर गुन्हा दाखल; तात्काळ अटकेची हिंदु जनजागृती समितीची मागणी
नवी मुंबई (९ जून २०२६): नेरूळ येथे एका ख्रिश्चन नर्सने हिंदू देवतांच्या मूर्तींची आणि देवघराची जाणीवपूर्वक विटंबना केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी नर्सने थेट चपलांच्या स्टँडजवळ देवाच्या मूर्ती फेकून दिल्याचा आरोप असून, या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदु जनजागृती समितीने या गंभीर घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हॉस्टेलच्या खोलीत राहणाऱ्या हर्षला पाटील या त्यांच्या खोलीतील देवघरात श्री गणेश आणि राधाकृष्ण यांच्या मूर्तींची नियमित पूजा करत असत. मे महिन्याच्या अखेरीस तिथे राहायला आलेल्या एका ख्रिश्चन नर्सने या देवघरावर सातत्याने आक्षेप घेत वाद घालण्यास सुरुवात केली होती.
५ जून २०२६ रोजी हर्षला कामावरून परतल्या असता, त्यांना हॉलमधील देवघर थेट चप्पल काढण्याच्या ठिकाणी ठेवलेले आणि मूर्ती खाली पाडलेल्या दिसल्या. याबाबत जाब विचारला असता, “मी ख्रिश्चन आहे, माझ्या समोर मला देव नको, मी तुमच्या देवाला मानत नाही,” असे म्हणत त्या नर्सने धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केले.
नोकरीवरून निलंबन आणि पुन्हा विटंबना
हा प्रकार रुग्णालय व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर व्यवस्थापनाने ६ जून २०२६ रोजी त्या ख्रिश्चन नर्सला तातडीने नोकरीवरून निलंबित केले. मात्र, या कारवाईचा राग मनात धरून तिने त्याच दिवशी संध्याकाळी सामान घेण्याच्या बहाण्याने पुन्हा रूममध्ये प्रवेश केला. सूडबुद्धीने तिने पुन्हा एकदा देवघर चपलांच्या ठिकाणी फेकून दिले. तक्रारदाराच्या अनुपस्थितीत तब्बल तीन वेळा मूर्तींची विटंबना करण्यात आली, तसेच जाताना हर्षला यांना “बाहेर भेट, तुला दाखवते,” अशी थेट धमकीही दिली.
पोलिसांत गुन्हा दाखल
या धार्मिक द्वेषातून घडलेल्या प्रकारानंतर हर्षला पाटील यांचे बंधू श्री. हर्षल पाटील यांनी हिंदु जनजागृती समितीशी संपर्क साधून साहाय्य मागितले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय कांबळे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९८ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा (FIR No. ०३११) नोंदवला आहे.
हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक
या प्रकरणी बोलताना रणरागिणी शाखेच्या मुंबई जिल्हा समन्वयक सौ. प्रवीणा पाटील म्हणाल्या, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर होणारे असले आघात आणि हिंदू देवतांची विटंबना कदापि खपवून घेतली जाणार नाही. पोलिसांची तत्परता स्वागतार्ह आहे; मात्र कायद्याचा धाक बसण्यासाठी आरोपी नर्सला तात्काळ अटक होणे आवश्यक आहे. अटक होईपर्यंत आम्ही या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत राहू.”
गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत असून आरोपीच्या अटकेची मागणी जोर धरत आहे.
