विना परवानगी राजकीय पक्षाची चिन्हे गाडीवर लावल्यास आरटीओ कारवाई
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.१९ – लोकसभा निवडणुकीच्या काळात खाजगी वाहनावर विना परवानगीराजकीय पक्षाची चिन्हे वाहनावर लावली गेल्यास संबधित व्यक्तीवर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. राजकीय पक्षाची चिन्हे लावण्यासाठी वाहन चालकांना परवानगी घ्यावी लागणार आहे. सदर परवानगी अर्ज निवडणूक कार्यालयात तसेच आरटीओ कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.
निवडणुकीत प्रचारासाठी खाजगी वाहनाचा वापर केला जात असून या वाहनावर प्रचारा दरम्यान किंवा इतर वेळी देखील राजकीय पक्षाची चिन्हे लावली जातात. हा एक प्रचाराचाच भाग असून गाडीवर लावलेली चिन्हे देखील निवडणूक खर्चात मोजली जाणार आहेत. यामुळेच निवडणुकीच्या काळात वाहनावर राजकीय पक्षाची चिन्हे लावण्यापूर्वी निवडणूक अधिकार्याची किंवा आरटीओची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी अर्जासमवेत संबधित राजकीय पक्षाच्या प्रचार प्रमुखाचे पत्र जोडणे आवश्यक असून असे पत्र असलेल्या अर्जाधारकानाच वाहनावर राजकीय पक्षाचे चिन्ह लावण्याची अनुमती दिली जाणार असल्याचे कल्याण आरटीओ ससाणे यांनी सांगितले