36 फूट खोल विहिरीत पडलेल्या गायीची 6 तासांनी सुटका
( श्रीराम कांदु )
डोंबिवली – एवढ्या-तेवढ्या नव्हे तर तब्बल 36 फूट खोल विहिरीत पडलेल्या गायीची कल्याणच्या अग्निशमन दलाने प्रयत्नांची शर्थ करीत सुखरूप सुटका केली. कल्याण पश्चिमेतील राम-मारूती मंदिर परिसरात हा प्रकार घडला. विशेष म्हणजे या खोल विहिरीतून गायीला बाहेर काढायला अग्निशमन दलाला 6 तास लागले.
मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राम-मारूती मंदिर परिसरात असलेल्या विहिरीत एक गाय पडली. ही माहिती कल्याण अग्निशमन दलाला मिळाली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र लहान रस्ते, अरुंद जागा यामुळे गायीला बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडथळे येत होते. तसेच ही गाय बहुधा गर्भवती असल्याने आम्हाला अधिक काळजीपूर्वक तिला बाहेर काढावे लागले. मात्र सुरुवातीला प्राथमिक प्रयत्न करूनही तिला बाहेर काढता येणे शक्य नसल्याने अखेर हायड्रा क्रेन मागवून दोरीच्या साहाय्याने तिला सुखरूप बाहेर काढल्याची माहिती अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेले हे सुटकेचे ऑपरेशन संपायला दुपारचे 2 वाजले होते. अग्निशमन अधिकारी चौधरी यांच्यासह आंबोकर, केशव पागी, सदू पागी, पवार, भाकरे, शेमले या अग्निशमन जवानांनी या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता. तर गायीला सुखरूप बाहेर काढल्यानंतर स्थानिक रहिवाश्यांनी आनंद व्यक्त करण्याबरोबरच अग्निशमन दलाचे खूप आभार मानले.