किचकट गुन्ह्याचा अवघ्या चार दिवसांत उलगडा
आईंवरून शिव्या हासडल्याच्या वादातून प्रेयसीची निर्घृण हत्या
क्राईम ब्रँचच्या तपासाला यश
मारेकऱ्याने दिली खुनाची कबूली
( श्रीराम कांदु )
डोंबिवली : चार दिवसांपूर्वी कल्याण जवळच्या वाडेघर परिसरात एका महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या हत्येचा उलगडा करण्यात क्राईम ब्रँचच्या कल्याण युनीटला यश आले आहे. हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव लताबाई महादेव गवई (35) असे आहे. तर ज्ञानेश्वर काळूराम पाटील (32) असे आरोपीचे नाव असून तो कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावात राहणारा आहे. धक्कादायक बाब म्हणजे आईवरून शिवी हासडल्यामुळे या महिलेची हत्या प्रियकरानेच केल्याचे उघड झाले आहे.
कल्याण पश्चिमेकडील वाडेघर परिसरात नीलकंठ कॉम्प्लेक्स परिसरात 6 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका 35 ते 40 वर्षाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. हा प्रकार सकाळी उजाडल्यानंतर उघडकीस आल्यावर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता पालिकेच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात. पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र या महिलेची ओळख पटू नये म्हणून दगडाने ठेचून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. या महिलेच्या हातावर सुनील असे नाव गोंदलेले आहे. ही महिला मजूर असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी रक्ताने माखलेला अवजड दगड पडला होता. पोलिसांनी हा दगड देखिल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून या महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू केले होते. खडकपाडा पोलिसांसह क्राईम ब्रँचने समांतर तपास सुरू केला. बातमीदाराच्या माहितीनुसार मूळची बुलढाण्याची असलेली लताबाई सापर्डे गावात राहत होती. तिचा पती खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहे. त्यामुळे सद्या ती एकटीच राहत होती. याच दरम्यान तिचे त्याच गावात राहणारा ज्ञानेश्वर याच्याशी अनैतिक संबध निर्माण झाले. या अनैतिक संबधाची कुणकुण लागल्याने तिला पतीने सोडून दिले. यामुळे ती दुसरीकडे राहत होती. मात्र 6 ऑक्टोबरला रात्रीच्या सुमाराला सापर्डे गावातील पाटील चायनीज दुकानात एकमेकांची भेट झाली. त्यावेळी दोघांनीही भरपूर दारू ढोसली होती. दारूच्या नशेत असल्याने दोघामध्ये काही कारणावरून वाद-विवाद होवून लताबाईने प्रियकर ज्ञानेश्वरला आईवरून शिवी हासडली. याचाच राग मनात धरून त्याने घरी सोडण्याच्या बहाण्याने तिला आपल्या दुचाकीवर बसून वाडेघर परिसरात एका निर्जळस्थळी नेले. प्रथम लताबाईचा गळा आवळा. मात्र तरीही जिंवत असल्याचे पाहून ज्ञानेश्वरने शेजारी पडलेल्या भल्या मोठ्या दगडाच्या साह्याने डोके ठेचून लताबाईचा मुडदा पाडला.
👉असा अडकला खूनी जाळ्यात : स्थानिक खडकपाडा पोलिसांसह क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन, फौजदार नितीन मुदगून, पवन ठाकूर, जमादार ज्योतीराम साळुंखे, दत्ताराम भोसले, विलास मालशेटे, राजेंद्र खिलारे, अजित राजपूत या पथकाने सापर्डे परिसरात गेल्या चार दिवसांपासून जाळे पसरले होते. या जाळ्यात ज्ञानेश्वर अलगद अडकला. प्राथमिक चौकशीत कोणतीही माहिती न देणाऱ्या ज्ञानेश्वरने खाक्या मिळताच लताबाईच्या खुनाची कबूली दिली. 3 मुले असलेल्या लताबाईला नवऱ्याने बुलढण्याहून हाकलून दिल्यानंतर ती कल्याणच्या सापर्डे गावात गेल्या 10 वर्षांपासून सुनील अहिरवाल नामक एका पेंटरची रखेल म्हणून त्याच्या सोबत राहत होती. मात्र तिचे त्याच गावात राहणारा ज्ञानेश्वर पाटील याच्याशी सूत जुळले होते. अखेर फाटक्या तोंडाच्या लताबाईच्या आईवरून शिव्या हासडल्यामुळे संतापाच्या भरात आपण तिचा मुडदा पडल्याची कबूली ज्ञानेश्वरने दिली. मात्र त्याच्याविरोधात कोणत्याही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नाही. आरोपी ज्ञानेश्वर याला खडकपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.