राजकीय

भाजपने ब्राह्मण समाजाला गृहीत धरू नये – महाराष्ट्र ब्राह्मण सभा

ब्राह्मण समाजाने हिंदुत्वाच्या समर्थनार्थ कायम उभे राहून भाजपला पाठिंबा दिला आहे, आणि भविष्यातही तो पाठिंबा कायम राहील. मात्र, या वेळी उमेदवारी न मिळाल्यास समाजाला आपली भूमिका पुनर्विचारावी लागेल, असा गंभीर इशारा महाराष्ट्र ब्राह्मण सभा अध्यक्ष डॉ. सचिन बोधनी यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवलेला पत्रातून दिलेला आहे.

आपल्या पत्रात डॉ. बोधनी म्हणतात, ब्राह्मण समाजाने आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला नेहमीच संपूर्ण पाठिंबा दिला आहे आणि आम्ही आपल्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवतो. मात्र, सध्या राज्यातील ब्राह्मण समाजाला राजकीय प्रतिनिधित्वाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभेसाठी किमान 30 जागा ब्राह्मण समाजाला देण्याची आमची मागणी आहे.

राज्यातील ४५ विधानसभा मतदारसंघांमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या निर्णायक आहे. त्यापैकी किमान ३० जागांवर ब्राह्मण उमेदवारांना संधी मिळावी, अशी आमची मागणी आहे. पुण्यातील कोथरूड, कसबा तसेच पिंपरी-चिंचवड, ठाणे, कल्याण-डोंबिवली या मतदारसंघांमध्ये ब्राह्मण उमेदवार निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार उपलब्ध आहेत. योग्य वेळी आम्ही त्यांची नावे सादर करू.

गेल्या काही वर्षांत राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न झाले आहेत, ज्यात ब्राह्मण समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले आहे. या परिस्थितीत ब्राह्मण समाजाला राजकीय भूमिका घेणे अनिवार्य झाले आहे, त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत, असे डॉ.बोधनी यांनी पत्रात स्पष्ट केले.

राज्यभरातील विविध समाजांनी संघटित होऊन राजकीय जागरूकता दाखवली आहे. ब्राह्मण समाजही आता जागरूक होऊन संघटित होत आहे. शिक्षण, नोकरी यासारख्या क्षेत्रात आरक्षण नसतानाही ब्राह्मण समाज आपल्या कष्ट, बुद्धिमत्ता, व गुणवत्तेच्या जोरावर टिकून आहे.

म्हणून भाजपने ब्राह्मण समाजाला गृहीत धरू नये. राज्यभरात अनेक मतदारसंघांमध्ये सक्षम ब्राह्मण नेते आहेत, मात्र त्यांना पुढे येण्याची संधी मिळत नाही. संधी मिळाल्यावर त्यांनी नेहमीच त्यांचे नेतृत्व सिद्ध केलेले आहे. म्हणून, योग्य उमेदवारांना संधी दिल्यास ब्राह्मण समाजही यशस्वी नेतृत्व देऊ शकेल, अशी ग्वाही डा. बोधनी यांनी दिली आहे.

ब्राह्मण समाजाने आतापर्यंत संघर्ष नको म्हणून बरेच त्याग केले आहेत, पण आता समाजाला संघर्ष करण्याची गरज आहे, आणि यासाठी पक्षाने ब्राह्मण उमेदवारांना संधी देऊन त्यांचा योग्य सन्मान करावा.