मराठा समाजाचे मागासलेपण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग ४०० कोटी रुपये देण्याची मागणी करणार
मुंबई दि.२४ – मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता ४०० कोटी रुपये देण्याची मागणी राज्य मागासवर्ग आयोग राज्य सरकारकडे करणार आहे. इतर मागास वर्ग (ओबीसी), मराठा, विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) अशा सर्व प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी आवश्यक असणारी गुणांकन पत्रिका एकसमान असावी, असा निर्णय महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.
गुणांकन पत्रिका बनवण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यातील ९० टक्के काम पूर्ण झाले असून, १० टक्के काम बाकी आहे. गुणांकन पत्रिका तयार झाल्यानंतर निकष तयार होतील. दरम्यान, आयोगाकडून राज्य सरकारकडे विविध कामांसाठी ४०० कोटी रुपयांची मागणी केली जाणार आहे, असेही आयोगाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.