बोरिवली- विरार पाचवी, सहावी मार्गिका; खारफुटीच्या जमिनीवर रेल्वेची काम करण्यास ‘एमआरव्हीसी’ ला मान्यता
मुंबई दि.२४ – पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरार दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाआड येणा-या खारफुटीच्या जमिनीवर रेल्वेची कामे करण्यास राज्य सरकारने मुंबई रेल्वे विकास महामंडळाला (एमआरव्हीसी) तत्वत: मान्यता दिली आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी-३ अ) अंतर्गत पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरारदरम्यान २६ किमीच्या पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम करण्यात येणार आहे.
या कामासाठी २,१८४.०२ कोटी रुपये मंजूर झाले असून डिसेंबर २०२७ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे एमआरव्हीसीचे लक्ष्य आहे. सध्या या प्रकल्पामधील बाधित झाडांची वृक्षतोड करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वृक्षतोडीचे प्रस्ताव आणि ठाणे आणि पालघरचे जिल्हाधिकारी यांना भूसंपादनाचे प्रस्ताव सादर करून प्रशासकीय प्रक्रिया केली जात आहे. तसेच पादचारी पूल, फलाटे व त्यावरील छताबाबत निविदा प्रक्रिया सुरू आहे.