राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई दि.२५ :- राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या बैठकीत केली. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
पुणे मेट्रो क्रमांक ३ च्या कामाला वेग देतानाच शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय, टाटा कंपनी आणि मेट्रो यांनी त्रिपक्षीय करार करण्याची कार्यवाही करावी. अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारा निधी येत्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर करून घेण्यात यावा. कोकणाच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या रेवस ते रेड्डी किनारा महामार्गाला वेग देण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केल्या.