ठळक बातम्या

मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना आदेश

मुंबई, दि. १
स्वच्छता केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापालिका आयुक्त/प्रशासक इक्बालसिंह चहेल यांना दिले.
स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या राज्यस्तरीय मोहिमेचा शुभारंभ आज गिरगाव चौपाटी येथे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला.
त्यानंतर कुर्ला येथील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. केवळ मुख्य रस्ते, चौक, समुद्र किनारे यांची स्वच्छता करण्याबरोबरच गल्ली बोळातील रस्त्यांची, झोपडपट्टी तेथील परिसर, शौचालये, गटारे यांची साफसफाई झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
यावेळी या वसाहतीमधील शौचालयाची आणि त्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता त्याठिकाणी अस्वच्छता आणि दुर्गंधी असल्याचे निदर्शनास आले. स्थानिकांना सर्व सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. दररोज पाच वेळा स्वच्छतागृहांची स्वच्छता करावी, पालिकेच्या खर्चाने त्याची दुरुस्ती, डागडुजी करावी आणि तसे न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावावी, कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी असे स्पष्ट आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी आयुक्त चहल यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *