बृहन्मुंबई महापालिकेच्या मोहिमेत ३० वर्षांवरील १३ लाख नागरिकांची मधुमेह आणि रक्ततपासणी
मुंबई, दि. १
बृहन्मुंबई महापालिकेने असंसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी हाती घेतलेल्या मोहिमेत ३० वर्षांवरील जवळपास १३ लाख नागरिकांची मधुमेह आणि रक्ततपासणी करण्यात आली.
जानेवारी २०२३ पासून आरोग्य सेविका व आशा सेविका ३० वर्षांवरील व्यक्तींच्या घरी जाऊन उचरक्तदाब तपासणी सर्वेक्षण करीत आहेत. आतापर्यंत एकूण १० लाख ४५ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली महापालिकेची वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये व विशेष रुग्णालये मिळून २६ मधुमेह व रक्तदाब तपासणी केंद्रातर्फे ऑगस्ट२०२२पासून आतापर्यंत ३० वर्षांवरील सुमारे अडीच लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली.
मुंबईमध्ये २०२२ मध्ये नोंदणीकृत मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू हे हृदयरोग, उच्च रक्तदाब व इतर हृदयरोगामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. हृदयरोग संबंधित आजार हे मृत्यूचे प्रमुख कारण असल्याने नागरिकांना हृदयरोग व पोषक आहाराचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. यामुळे हृदयरोग, पक्षाघात, मधुमेह, उच्च रक्तदाब या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
निरोगी जीवनशैली व विशेषतः निरोगी हृदयासाठी ३० वर्षांवरील नागरिकांनी नियमितपणे तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.