ठळक बातम्या

बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय विभागातील १५ हजार भटक्‍या श्‍वानांचे रेबिज लसीकरण

मुंबई, दि. २९
‘रेबिजमुक्त मुंबई’साठी बृहन्मुंबई महापालिकेतर्फे महापालिका क्षेत्रातील ६ प्रशासकीय विभागांमधील १५ हजार भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण करण्‍यात येणार आहे. या मोहिमेसाठी महापालिकेला १५ स्‍वयंसेवी संस्‍थांचे सहकार्य लाभले आहे.
लसीकरणानंतर प्रायोगिक तत्वावर काही भटक्‍या श्‍वानांच्‍या गळ्यात ‘क्‍यूआर कोड’ असलेले ‘कॉलर’ घालण्‍यात येणार आहेत. परिणामी, क्‍यूआर कोड स्कॅन केल्यावर श्‍वानाच्‍या माहितीसह त्‍याला खाद्य देणाऱ्याचा (फिडर) तपशील, लसीकरण आणि वैद्यकीय माहिती प्राप्त होण्‍यास मदत मिळणार आहे. हे लसीकरण भ्रमणध्वनी ॲपआधारित होणार असून राज्यात पहिल्यांदाच भ्रमणध्वनी ॲपआधारित रेबिज लसीकरण केले जाणार आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख तथा देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ.कलीमपाशा पठाण यांनी दिली.
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई शहर वाहतूक विभाग, बोरिजर इंगलहाईम, पेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ मुंबई या स्वयंसेवी संस्थेसह इतर काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने २९ सप्टेंबर २०२३ ते १० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एस आणि टी विभागातील जवळपास १५ हजार भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी शंभर कर्मचारी कार्यरत असणार आहेत.
२०१४ मधील सर्वेक्षणानुसार, मुंबईमध्ये सुमारे ९५ हजार भटके श्‍वान होते. ती संख्या आता सुमारे १ लाख ६४ हजारांवर पोहोचल्याचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *