बृहन्मुंबई महापालिका आयोजित श्रीगणेश गौरव स्पर्धेत पंचगंगा सार्वजनिक मंडळाला प्रथम पारितोषिक
ताराबाग मंडळ दुसरे तर (माझगाव)महादेवाची वाडी तिसरे
मुंबई, दि. २९
बृहन्मुंबई महापालिका आयोजित ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार-२०२३’ या स्पर्धेत लोअर परळ येथील पंचगंगा सार्वजनिक मंडळाला प्रथम पुरस्कार (रुपये ७५,००० आणि सन्मानचिन्ह) मिळाला.
महापालिका मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत महापालिका उपायुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.
माझगावच्या ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला द्वितीय (रुपये ५०,००० आणि सन्मानचिन्ह) तर परळ येथील महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तृतीय पुरस्कार (रुपये ३५,००० आणि सन्मानचिन्ह) मिळाला.
शाडू मातीच्या सर्वोत्कृष्ट श्रीगणेशमूर्तीचा पुरस्कार काजूवाडी येथील श्री गणेश क्रीडा मंडळास, सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराचे पारितोषिक प्रभाकर मुळये (विकास मंडळ साईविहार, भांडूप) यांना तसेच सर्वोत्कृष्ट नेपथ्यकाराचे पारितोषिक प्रदीप पंडित (पंगेरी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ) यांना जाहीर करण्यात आले.
याशिवाय, १४ मंडळांना विशेष प्रशस्तीपत्रकही जाहीर करण्यात आले. यंदा स्पर्धेचे ३४ वे वर्ष होते. स्पर्धेत ६१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी झाली होती.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे सेवानिवृत्त प्रा. नितीन केणी, पाटकर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा.आनंद पेठे, जे.के. ऍकेडमी ऑफ आर्ट ऍण्ड डिझाईनचे प्रा. नितीन किटुकले, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे सदस्य श
विकास माने, पत्रकार मारुती मोरे, मनपा कला शिक्षण विभागाचे कला प्राचार्य दिनकर पवार, कला विभागाचे प्रतिनिधी अजित पाटील, दीपक चौधरी, गणेश गोसावी यांनी काम पाहिले.