ढोल हलगीच्या तालावर, लेझीम खेळत गणपती बाप्पाला निरोप!
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची पारंपरिक आणि आदर्श विसर्जन मिरवणूक
डोंबिवली, दि. २९
ढोल हलगीच्या तालावर आणि आबालवृद्धांनी लेझीम खेळत गणपती बाप्पाला निरोप दिला. टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ही पारंपरिक विसर्जन मिरवणूक समस्त डोंबिवलीकरांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
फुलांनी सजवलेल्या पालखीत विराजमान गणपती बाप्पा, बाजूला अब्दागीरी घेतलेले मावळे, बाप्पाला ओवाळायला जागोजागी उभ्या असलेल्या सुवासिनी असे चित्र विसर्जन मिरवणूक मार्गावर पाहायला मिळाले.
विसर्जन मिरवणूक सुरू करण्यापूर्वी सुयोग मंगल कार्यालयात महाआरती करण्यात आली. असंख्य भाविक आणि मंडळाचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. टाळ आणि हलगीच्या तालावर कार्यकर्त्यांनी केलेला बाप्पाच्या गजर, फुलांच्या आकर्षक पायघड्या असे वातावरण या ठिकाणी होते.
विसर्जन मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी काही संस्था, नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे पाणी, सरबत,पोहे याची व्यवस्था केली होती.
पारसमणी चौकातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर लेझीम खेळणाऱ्यांनी केलेले रिंगण लक्षवेधी होते. विसर्जनानंतर सुयोग मंगल कार्यालयात भाविक,कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी दडपे पोहे, पेढा, काकडी आणि ताक अशी प्रसादाची व्यवस्था टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केली होती.
पुढील वर्षी टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अमृत महोत्सव वर्ष आहे.