हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक; बेलापूर ते पनवेलदरम्यान लोकल सेवा रद्द
मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक नाही
मुंबई, दि. २९
हार्बर मार्गावरील पनवेल रिमॉडलिंग आणि मालवाहतुकीच्या कामासाठी हार्बर मार्गावर शनिवारी रात्री अकरा वाजल्यापासून सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे बेलापूर ते पनवेलदरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.
या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या इतर मार्गावर रविवारी ब्लाॅक न घेण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मध्य रेल्वेमार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणदरम्यान, हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, बीएसयू मार्गिका नेरूळ / बेलापूर – खारकोपरदरम्यान रविवारी कोणताही ब्लाॅक घेण्यात येणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.