मध्य रेल्वेवरील चार स्थानकात सिनेडोम उभारणार
मुंबई, दि. २५
मध्य रेल्वेवरील डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी या रेल्वे स्थानकांमध्ये ‘प्री-फॅब्रिकेटेड सिनेडोम’ उभारण्यात येणार आहेत.
यामुळे प्रवाशांना स्थानकांमध्ये माहितीपट, चित्रपट, लघुपट पाहता येतील. सध्या मध्य रेल्वेवरील स्थानकांचा पुनर्विकास सुरू असून स्थानकामध्ये प्रवासीभिमुख सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. यातून मध्य रेल्वेला महसूल मिळणार असून रेल्वे लवकरच ऑनलाइन निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात येणार आहे.
प्री- फॅब्रिकेटेड सिनेडोम’ ही तात्पुरती व्यवस्था असून त्यासाठी कायमस्वरूपी बांधकाम करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. ‘सिनेडोम’च्या व्यवस्थापन आणि प्रचालनाची जबाबदारी कंत्राटदारावरच सोपविण्यात येणार आहे. ‘प्री-फॅब्रिकेटेड सिनेडोम’ची उभारणी, संचालन, देखभाल आणि व्यवस्थापन जबाबदारी पूर्णत: परवानाधारकाची असून त्यासाठी येणारा खर्चही त्यालाच करावा लागणार आहे.
गर्दीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी परवानाधारकाची असेल. दहा वर्षांच्या कालावधीसाठी उपरोक्त स्थानकांवर ‘प्री-फॅब्रिकेटेड सिनेडोम’ उभारण्यात येणार आहेत.