Skip to content
माफत दर, कमी वेळात मौखिक आरोग्याशी संबंधित उपचार
मुंबई दि.१५ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी काल येथे भेट देऊन कामाचा आढावा घेतला. येत्या दोन महिन्यांत इमारतीची उर्वरीत कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
अकरा मजली इमारतीमध्ये पहिले सहा मजले रुग्ण सुविधेसाठी असून उर्वरीत पाच मजले विद्यार्थी वसतिगृहासाठी देण्यात येणार आहेत. रुग्ण आणि विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्रशस्त, सर्व सुविधायुक्त उपहारगृह सुरू करण्यात येणार आहे. इमारतीमध्ये सध्या सुरू असलेल्या कामांमध्ये क्लिनिकल विभाग, रेडिऑल़ॉजी, विद्यार्थ्यांसाठी वर्ग कक्ष, फॅन्टम आणि सिम्युलेटर प्रयोगशाळा आदींचे काम अंतिम टप्प्यात आहे.
दंत रुग्णांच्या वैद्यकीय उपचार सुविधेसाठी जपानहून अद्ययावत संयंत्र नायर रूग्णालयात दाखल झाले आहे. मौखिक उपचारांमध्ये जबडा आणि दातांच्या उपचारासाठी सीबीसीटी संयंत्र वापरात येणार असून त्यामुळे आजाराचे वेळीच आणि नेमके निदान होण्यासाठी मदत होईल. मौखिक कर्करोग उपचार केंद्र, तंबाखू अधीन रुग्णांच्या तपासणीसाठी सुविधा अशा अनेक वैशिष्ट्यांचा नव्याने समावेश या विस्तारीत इमारतीमधील विभागात असणार आहे.
इन्प्लांटोलॉजी सेंटरमुळे रुग्णांची दाताची कवळी बदलण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. महत्वाचे म्हणजे या उपचारासाठीचा खर्चही कमी होईल. कवळी बदलण्यासाठी सव्वा लाख रूपये इतका खर्च येतो, येथे अवघ्या २५ हजार रुपयांमध्ये हे उपचार करता येतील, अशी माहिती संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) तथा अधिष्ठाता (नायर रुग्णालय दंत महाविद्यालय) डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.