Skip to content
ठाणे दि.१३ :- समरसता प्रस्थापित करण्यासाठी समान नागरी कायदा महत्त्वाचा आहे. समाजातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असलेल्या ‘महिलांना समान न्याय मिळण्यासाठी’ हा कायदा प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आणि ज्येष्ठ विचारवंत आरिफ मोहम्मद खान यांनी येथे केले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे ‘समान नागरी कायदा कशासाठी आणि कसा?’ या विषयावर आरिफ मोहम्मद खान यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, कोषाध्यक्ष अरविंद रेगे, कार्यकारी संचालक डॉ. जयंत कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य सुजय पतकी व्यासपीठावर होते.
या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे कोणत्याही धर्मात-पंथात कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही, कोणत्याही धर्मावर संकट न येता सर्वांचे धर्माधिकार अबाधितच राहतील. तिहेरी तलाक संबंधित कायदा लागू होतानाही विविध प्रकारचे हितसंबंध असणाऱ्या स्वार्थी घटकांनी असाच विरोध आणि बुद्धिभेद केला होता. मात्र हा कायदा लागू झाल्यानंतर कोणाच्याही धार्मिक अधिकारांवर गदा आली नाही, उलट तलाकचे प्रमाण सुमारे ९५ टक्क्यांनी कमी होऊन असंख्य महिलांचे आणि परिवारांचे जीवनमान सुधारले. असे खान यांनी सांगितले.