Skip to content
मुंबई दि.१३ :- सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या आरोग्य संस्थांमध्ये येत्या १५ ऑगस्टपासून वैद्यकीय सेवा पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहेत. आरोग्य संस्थेमध्ये येणाऱ्या रुग्णांची सरकारने अधिकृत केलेल्या ओळखपत्रांच्या आधारे मोफत नोंदणी केली जावी, आरोग्य संस्थांमधील सर्व प्रकारच्या तपासण्या निःशुल्क कराव्यात, बाह्यरुग्ण विभागामध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना बाहेरून औषधे व इतर कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय बाबी विकत घेण्यासाठी चिठ्ठी देऊ नये, क्वचित प्रसंगी बाहेरील औषध रुग्णांना देणे आवश्यक असल्यास आरकेएस अनुदानातून स्थानिकरित्या औषध खरेदी करून रुग्णाला मोफत औषध उपलब्ध करून देण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आरोग्य संस्थांमध्ये होणाऱ्या चाचण्यांचे (ईसीजी, एक्स-रे, सिटीस्कॅन, प्रयोगशाळा चाचण्या) कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये. यापूर्वी रुग्णांकडून जमा करण्यात आलेले शुल्क सरकारी खाती अथवा रुग्ण कल्याण निधीमध्ये जमा करण्यात यावे व त्यासंदर्भातील लेखाजोखा अद्ययावत करण्यात यावा, आरोग्य संस्थेच्या आवारात दर्शनी भागामध्ये याविषयी माहिती देणारे फलक लावावेत, असेही निर्देशही देण्यात आले आहेत. आरोग्य संस्थेच्या रुग्णसेवेबाबत शुल्क आकारल्याची तक्रार टोल फ्री १०४ क्रमांकावर करता येणार आहे.