ठाणे दि.१३ :- ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराअभावी सहा रुग्णांचा मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, गेल्या १२ तासात रुग्णालयात आणखी १६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मृत पावलेले काही रुग्ण वयोवृद्ध होते तर काही रुग्णांना खासगी रुग्णालयातून अतिशय अत्यवस्थ अवस्थेत शेवटच्या क्षणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, असा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे. शनिवार रात्री साडेदहा ते रविवारी सकाळी साडेआठ या वेळेत हे रुग्ण दगावले आहेत.
त्यातील १३ रुग्णांवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तर ३ रुग्णांवर सामान्य कक्षात उपचार सुरू होते. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागी सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे रुग्णांचा भार कळवा रुग्णालयावर वाढला आहे. ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत आहेत. त्या तुलनेत डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे.दरम्यान कळवा येथील रुग्णालयातील दुर्दैवी, धक्कादायक घटनेबाबत ठाणे महापालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी यांच्याकडून संपूर्ण माहिती घेत आहोत. या रुग्णांचा मृत्यू कसा झाला? त्याचा अहवाल दोन दिवसात येईल. त्यानंतर कारवाई केली जाईल. रुग्णाच्या जिवाशी होणारी हेळसांड सहन केली जाणार नाही, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.