मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा नागरिकांशी सुसंवाद
मुंबई दि. ७-
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘सरकार आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या १० आणि ११ मे रोजी नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतच्या निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन केसरकर यांनी केले आहे.
१० मे रोजी महापालिकेच्या ‘सी वॉर्ड’ मध्ये कॉन्फरन्स हॉल, सी विभाग कार्यालय, चंदनवाडी, मरीन लाईन्स येथे तर ११ मे रोजी ‘डी वॉर्ड’ मध्ये कॉन्फरन्स हॉल, डी विभाग कार्यालय, ग्रँट रोड (प.) येथे दुपारी ४ ते ६ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.
‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमास पालकमंत्री केसरकर यांच्यासोबत संबंधित विभागांचे लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे शासकीय तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
———