भूखंडावरील खुल्या क्षेत्राच्या जागेपैकी ५ टक्के जागा मियावाकी वनांसाठी
मुंबईच्या पर्यावरण संवर्धनासाठी धोरणात्मक निर्णय
मुंबई दि.०९ :- दहा हजार चौरस मीटर पेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावर इमारतीचे बांधकाम करताना भूखंडाच्या खुल्या क्षेत्रावरील काही भागात ‘मियावाकी वन’ विकसित करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना बृहन्मुंबई महापालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रातील १० हजार चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर इमारत बांधकाम करताना विकास नियंत्रण नियमावलीच्या संबंधित नियमांनुसार निर्धारित आकाराची जागा ही ‘खुले क्षेत्र’ असणे बंधनकारक आहे. यानुसार खुल्या क्षेत्रासाठी जेवढी जागा निर्धारित करण्यात येईल, त्या जागेच्या ५ टक्के इतक्या आकाराचे ‘मियावाकी वन’ विकसित करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
मियावाकी वन म्हणजे काय?
सामान्य वनांच्या` तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणा-या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात. एरवी सामान्य पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास जेवढा कालावधी लागतो, त्यातुलनेत साधारणपणे निम्म्यापेक्षा कमी कालावधीत तेवढ्याच उंचीचे झाड वाढते.
या वनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीची साधारणपणे दोन किंवा तीन वर्षे या वनांची नियमित देखभाल करावी लागते. त्यानंतर ही वने नैसर्गिकरित्या वाढतात आणि आपल्याला अव्याहतपणे प्राणवायू देत राहतात.