मुंबई आसपास संक्षिप्त
मुखपट्टीसक्तीसंदर्भात अद्याप निर्णय नाही
मुंबई दि.२२ :- चीनमध्ये करोनासंसर्ग पुन्हा वाढत असल्याने देशासह राज्यात खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. मात्र मुखपट्टीसक्तीसंदर्भात निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. सध्या काही देशांमध्ये संसर्गाचा फैलाव होत असेल तर राज्यामध्ये रुग्णसंख्येमध्ये वाढ होऊ नये यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती राज्याचे साथ रोगसर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
समृद्धी महामार्गावर दहा दिवसांत २९ अपघात
मुंबई – शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून ११ ते २० डिसेंबर या कालावधीत एकूण २९ रस्ते अपघात झाले असून एकाचा मृत्यू झाला. तर ३३ जण जखमी झाले. शिवाय विविध वाहतूक नियमांचे उल्लंघनही वाढत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यात राज्य शासनाला अपयशच आले आहे. यापैकी वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याची सर्वाधिक म्हणजे ६७ प्रकरणे दाखल झाली आहेत.
बृहन्मुंबई महापालिकेची ‘कॅग’ला नोटीस
मुंबई – करोनाकाळात केलेल्या खर्चाचे लेखापरीक्षण किंवा चौकशी तुम्हाला करता येणार नाही, असे बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने नियंत्रक व महालेखा परीक्षकांना (कॅग) कळवले आहे. महापालिकेच्या करोनाकाळातील खरेदी आणि कंत्राटांची चौकशी राज्य सरकारच्या विनंतीनुसार ‘कॅग’ करत आहे.‘साथरोग कायदा १८९७’ आणि ‘आपत्ती निवारण कायदा २००५’नुसार ही चौकशी करता येणार नाही, असे महापालिकेने ‘कॅग’ला पाठवलेल्या नोटिसीत म्हटले आहे.
सुशोभीकरण कामांवर देखरेख ठेवण्यासाठी दक्षता समिती
मुंबई – सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामांवर देखरेख ठेवण्यासाठी दक्षता समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही कामे ठरलेल्या मुदतीत पूर्ण होत आहेत की नाहीत, तसेच कामांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात येणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबई सुंदर आणि अधिक आकर्षक बनविण्यासाठी महापालिकेने ‘मुंबई सुशोभिकरण प्रकल्प’ हाती घेतला आहे.
अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका नाहीच
मुंबई – भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळूनही तो आदेश स्थगित असल्याने अद्याप तुरुंगातून सुटका न झालेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तुरुंग मुक्काम आता २७ डिसेंबरपर्यंत वाढला आहे. कारण जामिनाला स्थगिती देणाऱ्या आपल्या आदेशाची मुदत उच्च न्यायालयाने बुधवारी सीबीआयच्या विनंतीवरून वाढविली.