ठळक बातम्या

फाळणीबाबत नेहरूंची भूमिका योग्य की अयोग्य?

राहुल गांधींनी सिद्ध करावे- रणजित सावरकर

मुंबई दि.२० :- स्वातंत्र्यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फाळणी संबंधात जी भूमिका घेतली होती, त्या भूमिकेचेही परखड आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण करून ब्रिटिश सरकारच्या कागदपत्रांमधील नोंदींच्या आधारे फाळणीमुळे होणाऱ्या रक्तपाताचा ठपका ब्रिटिशांवर ठेवता येऊ नये, यासाठीही नेहरू यांनी योजना आखली होती. त्यासंबंधात असणारी कागदपत्रांमधील माहिती गंभीर असल्याचे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आता नेहरूंची ही कृती किती योग्य होती, ते सिद्ध करावे, असे आव्हानही सावरकर यांनी दिले.

कर्नाटक विधानसभेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा लावण्यावरून काँग्रेसने केलेला विरोध म्हणजे केवळ निवडणुकीचे राजकारण आहे. काँग्रेसने वाजपेयी सरकार असताना हिंदुत्वाच्या विचारांचे प्रणेते असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणे आणि विरोध करणे सुरू केले. त्यावेळी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात हे सारे केले गेले. त्यानंतर सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसने ते बंद केले आणि पुन्हा सत्तेवरून खाली येताच आणि भाजपा सरकार येताच आता हिंदुत्ववादी विचाराच्या सावरकरांवर पुन्हा आरोप करणे सुरू केले आहे. हे सारे सत्तेचे आणि निवडणुकीचे राजकारण आहे, असा दावा सावरकर यांनी केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब काँग्रेसच्या माजी पंतप्रधान आणि नेत्या दिवंगत इंदिरा गांधी यांनी केला होता. त्यांनी भले गांधीजीचा अनुनय केल्याचे सांगितले असले तरी इंदिरा गांधी यांनी सावरकरांनी सांगितलेल्या मार्गानुसारच संरक्षण, उद्योग क्षेत्रातील विविध निर्णय घेतले होते. याकडेही रणजित सावरकर यांनी लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *