बीडीडी चाळींच्या अन्य सहा इमारतींचे पाडकाम लवकरच
पुनर्विकासाला वेग देण्याचा ‘म्हाडा’ चा निर्णय
मुंबई दि.१९ :- ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाने ना. म.जोशी मार्ग बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. चार इमारतींचे पाडकाम पूर्ण झाल्यानंतर आता अन्य सहा इमारती जमीनदोस्त करण्याची तयारी ‘म्हाडा’ कडून सुरू करण्यात आली आहे.
इमारत क्रमांक ११, १२, ३० आणि ६ चे पाडकाम पूर्ण झाले आहे. सध्या इमारत क्रमांक ३, ४ आणि ५ चे पाडकाम सुरू असून जानेवारीमध्ये इमरत क्रमांक १३, १४ आणि १५ च्या पाडकामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
या सर्व इमारतींचे पाडकाम पूर्ण झाल्यानंतर तेथे पुनर्विसित इमारतींच्या बांधकामाला युद्धपातळीवर सुरुवात करण्यात येणार आहे. तेथे पहिल्या टप्प्यात एक हजार २३९ सदनिका बांधण्यात येणार आहेत. या सदनिकांचे काम जून २०२५ पर्यंत पूर्ण करून पात्र बीडीडीवासियांना त्यांचा ताबा देण्यात निर्णय येणार आहे.