सरकारमध्ये महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा- शरद पवार
राज्यपाल, राज्य शासनाच्या विरोधात महामोर्चा
मुंबई दि.१७ :- महापुरुषांचा अवमान, सीमाप्रश्न, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीतर्फे शनिवारी मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, ‘उबाठाशि’ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांची भाषणे यावेळी झाली.
केंद्र सरकारने लवकरात लवकर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करावी. या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धी सुरु झाली आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली. तर उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यावेळी मोर्चाची घोषणा केली गेली तेव्हा, तुम्ही मोर्चात चालणार का? असे मला विचारले.
आज तुम्ही पाहताय मी एकटा चालत नाहीये तर माझ्यासोबत लाखो महाराष्ट्रप्रेमी महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालत आहेत. शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. सावित्रीबाई फुले असो की डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्याबद्दल अवमानकारक बोलण्याचे कुभांड कोणी काढले? असा सवाल अजित पवार यांनी केला. तर आज संपूर्ण महाराष्ट्राचा रंग एकत्र आला आहे. महाराष्ट्र एक आहे ते सांगण्यासाठी एकत्र जमलो असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.