ठळक बातम्या

मुंबईतील हरित क्षेत्रे वाढविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यास सहकार्य

‘हरित क्षेत्र जपणूक व संवर्धन’ या विषयावरील कार्यशाळेत विविध संस्था, तज्ज्ञांचा सहभाग

मुंबई दि.१७ :- बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हरित-जागांची अधिकाधिक चांगली जपणूक व्हावी, वाढ व्हावी आणि मुंबईचे पर्यावरण सातत्याने समृद्ध व्हावे; या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने दोन दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते.  भायखळा परिसरातील ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय’ परिसरात झालेल्या कार्यशाळेत देशभरातील विविध संस्था आणि ६० पेक्षा अधिक तज्ज्ञ सहभागी झाले होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यावेळी म्हणाले, या कार्यशाळेमुळे भविष्यातील आव्हाने आणि त्यावरील संभाव्य उपाययोजना करण्याबाबत मोलाची माहिती उपलब्ध झाली आहे. या माहितीमुळे मुंबईतील हरित क्षेत्रे वाढवण्यासाठीची धोरणे आणि भविष्यातील कृती आराखडा तयार करण्यात मदत होणार आहे.”

या कार्यशाळेत बृहन्मुंबई महापालिकेच्य पर्यावरण, घन कचरा व्यवस्थापन खाते, उद्यान खात्याचे तसेच राज्य सरकारच्या अखत्यारितील कांदळवन कक्ष, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यशाळेत सेंटर फॉर अर्बन अँड रिजनल एक्सलन्स (क्युअर), स्त्री मुक्ती संघटना, चेन्नई रेझिलियन्स सेंटर यांच्यासह विविध सल्लागारांनी आपल्या अनुभव आधारित माहितीच्या आधारे विश्लेषणात्मक मांडणी केली.

हरित जागांसाठी उपलब्ध जागांची सुनिश्चितता करताना जैवविविधता, सार्वजनिकता, पोहोच यासारख्या विविध मानदंडाच्या आधारे विश्लेषण करणे, शहरातील जैवविविधता वाढविण्यासाठी जनजागृती, वृक्षारोपण यासारख्या विविध बाबींना प्रोत्साहन देणे, कांदळवन जागांबाबत संबंधितांना वेळोवेळी अवगत करणे, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील हरित जागांची माहिती देणारा ‘डॅशबोर्ड’ कार्यान्वित करणे आदी बाबींवर चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *