राणीच्या बागेला मूळ ओळख मिळाली!
नावात आता ‘वनस्पती उद्यान’ शब्दाचा समावेश
मुंबई दि.१६ :- मुंबईतील प्रसिद्ध राणीबाग आता वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालय या नावाने ओळखले जाणार आहे. मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाची मूळ वनस्पती उद्यान ही ओळख मिळवून देण्यासाठी सेव्ह राणीबाग बोटॅनिकल गार्डन फाऊंडेशनचा लढा सुरू होता. वनस्पती उद्यान उल्लेखाचा प्रस्ताव पालिका प्रशासक-आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला आता मंजुरी देण्यात आली आहे.
उद्यानात ६४ अंतर्गत बागांचा समावेश असून २५६ प्रजातींचे ४ हजार १३१ वृक्ष आहेत. यातील अनेक वृक्षांचे आयुष्यमान १०० वर्षांपेक्षा जास्त आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय हे मुंबईतील एकमेव असे वारसा दर्जा प्राप्त वनस्पती उद्यान आहे. वीरमाता जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाची स्थापना १८६१ मध्ये ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेने व्हिक्टोरिया गार्डन्स या नावाने एक वनस्पती उद्यान म्हणून केली.
तत्कालीन ब्रिटीश राजवटीचा हा पहिलाच सार्वजनिक प्रकल्प होता. १८९० साली या उद्यानात प्राणिसंग्रहालयाची भर घालण्यात आल्याने हे उद्यान अतिशय लोकप्रिय झाले. १९६९ मध्ये उद्यानाचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान असे झाले, तर १९८० मध्ये वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय असे ठेवण्यात आले.