कल्याण येथे उद्या महारोजगार मेळावा
विविध उद्योग कंपन्यांमध्ये १३ हजार पदांवर नोकरीची संधी
कल्याण दि.१६ :- ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे उद्या शनिवारी ( १७ डिसेंबर) कल्याण येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात विविध नामांकीत कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योगातील सुमारे १३ हजार रिक्त पदांसाठी कंपन्यांचे प्रतिनिधी थेट मुलाखती घेणार आहेत.
नोकरीइच्छूक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकतामंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. गुणगोपाळ मंदिर मैदान, तिसगाव, चक्की नाका चौक, कल्याण (पूर्व) येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ यावेळेत हा मेळावा होणार आहे. मेळाव्याचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.