कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात भारतीय मजदूर संघाचा विधिमंडळावर मोर्चा
संकल्प यात्रेला दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मभूमीतुन सुरवात
मुंबई दि.१६ :- संघटित आणि असंघीटत कामगारांच्या विविध मागण्या आणि प्रश्नांबाबत भारतीय मजदूर संघाच्या विदर्भ प्रदेशातर्फे येत्या २८ डिसेंबर रोजी नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. भारतीय मजदूर संघाच्या विदर्भ प्रदेशाध्यक्ष शिल्पा देशपांडे यांनी ‘भामसं’चे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या आर्वी या जन्मगावी झालेल्या सभेत ही घोषणा केली.
कामगार कायद्यातील एकतर्फी बदल, कामगारांच्या कायम स्वरूपी रोजगारावर आलेली गदा, महाराष्ट्रातील असंघीटत कामगारांना कोणत्याही प्रकारची नसलेली सामाजिक सुरक्षा, विविध ऊद्योगात वाढत चाललेली कंत्राटी कामगारांची मोठी संख्या, घटत चाललेल्या कायम स्वरूपी नोक-या आदी विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
या मोर्चाच्या निमित्ताने १२ डिसेंबरपासून विदर्भ प्रदेशामध्ये संकल्प यात्रेला सुरुवात झाली. भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार यांच्या नेतृत्वाखाली भंडारा, साकोली, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर, नागपूर अशा ठिकाणी कामगारांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. शिल्पा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली वर्धा, अमरावती, अकोला, शेगाव, बुलठाणा, यवतमाळ, वाशीम या जिल्ह्यात संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली.
असंघीटत कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कोड त्वरित लागू केले जावे, कंत्राटी कामगार पध्दत बंद करून तिथे रिक्त जागांवर कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांची कायम स्वरूपी नियुक्ती करावी, अंगणवाडी सेविका व ‘आशा’ वर्कर्स यांच्या मानधनात वाढ करून त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून घोषित करावे, विडी ऊद्योगातील कामगारांना किमान वेतनाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, बॅंक व आयुर्विमा महामंडळाचे खासगीकरण मागे घ्यावे आदी मागण्या ‘भामसं’कडून करण्यात आल्या.