चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीत वाढ
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.१५ :- संपूर्ण देशभरात चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नोव्हेंबर महिन्यात २३ लाख ८० हजार वाहनांची विक्री झाली, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने दिली.
गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत ही वाहनविक्री २६ टक्क्यांनी जास्त आहे. नवरात्रोत्सव, दिवाळी या सण- उत्सवांच्या काळापेक्षा नोव्हेंबर महिन्यात ही विक्री जास्त झाली. सण आणि उत्सव काळात दररोज ६८ हजार ७६५ वाहनांची विक्री झाली तर नोव्हेंबरमध्ये दररोज ७९ हजार ३४९ वाहनांची विक्री झाली.