कोस्टल रोडवरील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर दुप्पट करण्याचा निर्णय
मुंबई दि.१५ :- विकासकामे करताना भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे. मुंबईतील कोस्टल रोडचे काम करताना वरळी कोळीवाड्याजवळील पुलाच्या lदोन पिलरमधील अंतर ६० वरून १२० मीटर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे केली. ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल आणि कोळी बांधव उपस्थित होते.
वरळी जवळून कोस्टल रोड सी लिंकला जोडला जात आहे. तेथील क्लीव्ह लॅण्ड बंदर जवळ दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या कनेक्टरचे काम सुरू असून त्या पिलर मधील अंतर वाढविण्याची मागणी स्थानिक कोळी बांधवांची होती. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी कोळीबांधवांची बैठक घेतली होती. बैठकीत तज्ञांची समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार सात सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली होती.
समितीने महिनाभरात अहवाल देत अंतर ६० वरून १२० मीटर करण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानुसार गुरुवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोळीबांधवांची अंतर वाढविण्याची मागणी मान्य करीत या पिलरमधील अंतर १२० मीटर करण्याचा निर्णय जाहीर केला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीवर आज सकारात्मक निर्णय झाल्याने कोळी बांधवांच्या संस्थांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. बैठकीस मुंबई महापालिकेचे उपआयुक्त चक्रधर कांडळकर, कोस्टल रोडचे मुख्य अभियंता एम. एम. स्वामी, कोळी बांधवांचे प्रतिनिधी वेदांत काटकर, उज्वला पाटील, विजय वरळीकर, रॉकी कोळी आदी उपस्थित होते.