‘कडोंमपा’ ला उर्जा बचतीसाठी पुरस्कार – १८ कोटी युनिटची वीज बचत
डोंबिवली दि.१५ :- मागील १५ वर्षाच्या काळात अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा प्रभावी अवलंब करुन १८ कोटी युनिटची वीज बचत करणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेला महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाचा उर्जा बचतीसाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय पालिका रुग्णालयात उच्चतम दर्जेदार उर्जा कार्यक्षम सुविधा देऊन रुग्णसेवेत महत्वपूर्ण कामगिरी केल्याने रुग्णालय संवर्गातही पालिकेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ‘मेडा’ या समन्वयक एजन्सीतर्फे महापालिका विभाग, रुग्णालय विभागात केलेल्या उर्जा बचतीच्या उपाययोजना, राबविलेल्या उपक्रमांची माहिती उर्जा संवर्धन पुरस्कारासाठी मागविण्यात आली होती. राज्यातील महापालिका या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. हा १७ वा उर्जा संवर्धन पुरस्कार आहे. कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत आणि त्यांच्या सहका-यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेने २००७ पासून केलेल्या उर्जा बचतीच्या उपाययोजना, अपारंपारिक स्त्रोतांचा प्रभावी वापर करुन पालिका क्षेत्रात कशाप्रकारे सरकारी वीजेचे अवलंबन कमी केले आहे याचे सादरीकरण शासनाच्या उच्चस्तरिय समितीसमोर केले. सप्टेंबरमध्ये हे सादरीकरण शासनाकडे पाठविण्यात आले होते.
महापालिका हद्दीतील जुने सोडियम व्हेपर दिवे काढून त्या जागी ३३ हजार स्मार्ट उर्जा कार्यक्षम दिवे बसविण्यात आले आहेत. पालिका हद्दीत नवीन इमारतीची उभारणी झाल्यानंतर त्या इमारतीवर जोपर्यंत सौर उर्जा सयंत्र बसविले जात नाही. तोपर्यंत पालिकेच्या नगररचना विभागाकडून त्या इमारतीला बांधकाम पूर्णत्व आणि भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येत नाही. या सयंत्रामुळे एक हजार ८१४ इमारतींमध्ये सरकारी विजेचा वापर न करता गरम पाणी उपलब्ध झाले आहे. पालिका हद्दीतील ३५ इमारतींवर ०.५ मेगावॅट क्षमतेचे सौर उर्जा निर्मिती करणारे प्रकल्प विकासकांकडून सुरू करण्यात आले आहेत. या नैसर्गिक उर्जा स्त्रोतांमुळे पालिकेची १८ कोटी युनिटची वीज बचत झाली आहे.