बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण मिळणार
मुंबई दि.१४ :- बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना आता विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्य शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, शालेय शिक्षण विभाग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्यात मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते. बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडक शाळांमधील वय वर्षे १५ वरील मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल. हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर एकुण १ हजार १४६ शाळांपैकी टप्प्याटप्प्याने २४९ शाळांमधील नववी ते दहावीतील ४१ हजार ७७४ विद्यार्थ्यांकरीता सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे लोढा यांनी सांगितले.