मुंबई आसपास संक्षिप्त
आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणार
मुंबई दि.१४ :- राज्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १ हजार ५८५ रोजंदारी आणि तासिका कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संदर्भात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या होत्या. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने २९ जुलै २०२२ रोजी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी या कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २०२२ पासून नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुविधा संपन्न कुटुंब अभियान राबविणार
मुंबई – खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि इतर विविध विभागांची सांगड घालून राज्यातील ग्रामीण कुटुंबांना सक्षम करणारे सुविधा संपन्न कुटुंब अभियान राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी महिला व बालविकास, शालेय शिक्षण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, इतर मागास, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, कृषी, ग्रामीण विकास, मृद व जलसंधारण, महसूल, कौशल्य विकास, उच्च व तंत्र शिक्षण, मनरेगा, जलसंपदा तसेच पणन विभागाशी संबंधित कुटुंबे निवडण्यात येणार आहेत.
सहकारी संस्थांच्या थकहमीपोटी बँकेस रक्कम अदा करणार
मुंबई – सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी शासनाने बँकेस रक्कम देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. एकूण १३ सहकारी संस्थांच्या बाबतीत हा निर्णय घेण्यात आला. यापोटी ९६.५३ कोटी रुपये रकम बँकेस देण्यात येणार आहे.
आंबेगावातील ‘शिवसृष्टी’ प्रकल्पास ५० कोटींचा निधी
मुंबई – पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आंबेगाव बु. येथे साकारण्यात येणाऱ्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पास ५९ कोटी रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून देण्याच्या निर्णयास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. आंबेगांव येथे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्यावतीने शिवसृष्टी प्रकल्प निर्माण करण्यात येत आहे.